बुलडाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात मोठी गर्दी, हुल्लडबाजी

 कोरोना संक्रमणाच्या काळातही अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. बुलढाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात रविवारी मोठी गर्दी, हुल्लडबाजी दिसून आली.

Updated: Sep 15, 2020, 09:46 AM IST
बुलडाणा येथील उतावळी धरणावर कोरोना काळात मोठी गर्दी, हुल्लडबाजी

मयुर निकम / बुलडाणा - कोरोना संक्रमणाच्या काळातही अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. कोरोना संकटाबद्दल कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसलेले लोक अनेक ठिकाणी फिरायला जाणे तिथे गर्दी करणे आणि सर्व नियमांचे उल्लंघन करणे अशी जणू काही फॅशनच झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या उतावळी धरणावर रविवारी असाच काहीसा प्रकार दिसून आला. या धरणपरिसरात तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत हुल्लडबाजी केली. 

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा इथे उतावळी धरण असून या धरणावरची खूप मोठी गर्दी रविवारच्या सुटीच्या दिवशी दिसून आली. याठिकाणी येणारे अनेक जण लॉकडाऊन दरम्यान गावी आलेले आहेत. कुणी मुंबई तर कुणी पुण्याहून.  लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांना गावी यावं लागलं याचं मूळ कारण कोरोनाच संक्रमण. हे ते विसरले आणि आणि गावी आल्यावरही त्यांनी अशाप्रकारे नियमांना पायदळी तुडवत धांगडधिंगा सुरू केला. या उतावळी धरणावर गेल्या काही महिन्यांपासून ही मंडळी बिनधास्तपणे या ठिकाणी गर्दी करतात आणि अनेकदा ओल्या पार्ट्याही.

मात्र हे होत असताना स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष कसे झाले हे मात्र कळत नाही. जर त्यांनी दुर्लक्ष केले नसते तर रविवारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही गर्दी जमलीच नसती. कुणीही बोलायला नाही टोकायला नाही म्हणून ही तरुणाई अगदी आपल्याच धुंदीत नाचत आहेत. हा प्रकार 'झी मीडिया'ने दाखवतात जिल्हा प्रशासन मात्र खडबडून जागे झाले. याबाबतीत जिल्हा पोलीस अधीक्षकांना विचारले असता त्यांनी यावरचे उत्तर हे डिप्लोमॅटिक दिले.

कोरोना संक्रमनाच्या काळात अशा प्रकारे मद्यधुंद होऊन सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा करणे हे अशोभनीय आहे..तसेच याकडे स्थानिक प्रशासनाचे सोयीस्कर दूर्लक्ष असणे ते याहूनही अधिक गंभीर आहे त्यामुळे आता या सर्व प्रकारावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वेळ तर मारून नेली. मात्र या गर्दीमध्ये एखादा जरी कोरोना संक्रमित असला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात फैलाव झाला तर ही जबाबदारी नेमकी कुणाची हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.