Samruddhi Mahamarg Accident : एकीकडे समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे तर दुसरीकडे वाहनचालकाचा बेजबाबदारपणा कमी झालेला नाही. समृद्धी महामार्गावरील एका बस चालकाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय. तुफान वेगान लक्झरी बस चालवताना चालक चक्क इयरफोन लावून मोबाईल पाहत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी अशा प्रकारे कृत्य करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आधीच समृद्धीवर अपघातांची मालिका सुरू आहे. त्यातच असे बेजबाबदार चालक प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. समृद्धी महामार्गावरील एका बस चालक तुफान वेगान लक्झरी बस चालवताना मोबाईलचा वापर करत आहे. ड्रायव्हरच्या या कृत्यामुळे मोठा अपघात घडू शकतो. या प्रकाराची गंभीर दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अआहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
15 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलर बस रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, 20 प्रवासी जखमी झाले होते. वैजापूरजवळच्या जांबर गाव टोलनाक्यावर पोलिसांनी एका ट्रकला थांबवून बाजुला घेतलं. तेव्हाच पाठीमागून भरधाव वेगाने येणारी बस ट्रकली धडकली. बसमधले सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातल्या पाथर्डी आणि इंदिरानगरचे रहिवासी आहेत. हे प्रवासी सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते.
समृद्धी महामार्गावर झालेला अपघात आरटीओच्या अधिका-यांच्या चुकीमुळेच झाल्याचं समोर आले आहे. आरटीओ अधिका-यांनी ट्रक थांबवल्याचा व्हिडिओ सर्वात आधी झी २४ तासवर दाखवण्यात आला. समृद्धीवर अत्यंत वेगाने गाड्या जात असतानाही अधिका-यांनी ट्रकला भर रस्त्यातच थांबवलं होतं. याच ट्रकला धडकून टेम्पो ट्रॅव्हलरमधल्या 12 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताच्या काही काळ आधीचा ट्रक थांबवलेला हा व्हिडिओ आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी प्रदीप छबुराव राठोड आणि नितीनकुमार गणोरकर या दोन आर टी ओ अधिका-यांना अटक केली आहे.