अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : मेळघाटातील चिमुकल्या बालकांना होणाऱ्या पोटदुखी आजारावर उपचार म्हणून दोन लहान बालकांच्या पोटावर गरम विळ्याने दोन महिन्यांपूर्वी चटके दिल्याच्या दोन घटना ताज्या असतानाच सोमवारी पुन्हा चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावातील दोन वर्षीय चिमुकल्या मुलाच्या पोटावर उपचार म्हणून गरम चटके दिल्याचा धक्कादायक आणि तेवढाच संतापजनक प्रकार समोर आला होता.
या मुलाची प्रकृती गंभीर असल्याने बालकावर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताच आज मध्यरात्री या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावातील दिवेश अखंडे या दोन वर्षांच्या बालकांचे मागील दोन दिवसांपासून पोट फुगले होते. यावेळी या मुलाला रुग्णालयात नेण्या ऐवजी घरांच्यानी त्याच्या पोटावर गरम सडईचे चटके दिले.
अमरावती - मेळघाटात अंधश्रद्धेतून आणखी एक बळी । बाळाच्या पोटावर चटके दिल्याने दोन वर्षीय बालकाचा मृत्यू । चिखलदरामधील लवादा येथील धक्कादायक घटना ।पोटफुगीमूळे दिले होते घरच्यांनीच बाळाच्या पोटावर गरम चटके । अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू होते उपचार @ashish_jadhao pic.twitter.com/T7UOXPkopz
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 1, 2020
त्यामुळे मुलाची प्रकृती आणखी खालावल्यामुळे त्याला उपचारासाठी अचलपूर येथील रुग्णालयात नेले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला आता अमरावती येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणन्यात आले आहे. परंतु उपचारा दरम्यान या बालकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मेळघाट सारख्या दुर्गम भागात शिक्षनाचा अभाव आणि फोफावलेली अंधश्रद्धा यामुळे दिवसेंदिवस असे धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
मेळघाटातील आदिवासी बालकांना मोठया प्रमाणावर पोटफुगी या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारावर उपचारासाठी आरोग्य विभागाच्या सोयी सुविधा असताना देखील बहुतांश आदिवासी हे या रोगावर उपचार म्हणून लहान बालकांच्या पोटावर गरम वस्तुने चटके देतात. असाच धक्कादायक प्रकार दोन महिन्यापूर्वी उघडकीस आल्यानंतर शासनाच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम हाती घेण्यात आला असताच पून्हा असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.