भिवंडी दंगलीप्रकरणी एकाला १३ वर्षानंतर अटक

भिवंडीत १३ वर्षांपूर्वी पोलिस ठाण्याच्या बांधकामावरून उसळलेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. 

Updated: Feb 13, 2019, 11:38 PM IST
भिवंडी दंगलीप्रकरणी एकाला १३ वर्षानंतर अटक title=

ठाणे : भिवंडीत १३ वर्षांपूर्वी पोलिस ठाण्याच्या बांधकामावरून उसळलेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला नुकतीच अटक केली आहे. या आरोपीच्या पायाला गोळी लागली होती. गोळीचे व्रणही आरोपीच्या पायावर असून याच खुणेवरून आरोपीला पकडले असल्याची माहिती निजामपुरा पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. मोईनुउद्दीन गुलाम हुसेन मोमीन (३५ रा. भिवंडी) असे या आरोपीचे नाव आहे. भिवंडीतील क्वॉर्टर गेट मशिदीसमोर पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करत ६ जुलै २००६ रोजी रझा अकादमीसह अन्य मुस्लिम संघटनांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. जमावाने केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला होता. यात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला होता.

या प्रकारानंतर मध्यरात्री जमावाने दोन पोलिसांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. या दंगलीप्रकरणी सात ते आठ गुन्हे दाखल असून दंगलीतील १८ आरोपींची ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष सुटकाही झाली होती. या दंगलीतील मुख्य आरोपी युसूफ रजा याला मागील वर्षी भिवंडी पोलिसांनी अटक केली होती. याशिवाय इतरही आरोपींचा तपास सुरू असताना पोलिसांना एक निनावी पत्र मिळाले. या पत्रात एका आरोपीला गोळी लागली असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी मोमीन याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली असता त्याच्या पायाला जखमेचे व्रण होते. पोलिसांच्या तपासात ही खूण गोळीचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय मोमीन यानेही कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.