'पहाटेचा शपथविधी' ते 'दुपारचा शपथविधी'... गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील जनतेनं नेमका काय काय पाहिलं?

Ajit pawar joins eknath shinde led maharashtra government: अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर ठाकरे सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि आज म्हणजेच शिंदे सरकारमध्येही त्यांनी याच पदाची शपथ घेतली आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 15, 2024, 11:21 AM IST
'पहाटेचा शपथविधी' ते 'दुपारचा शपथविधी'... गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील जनतेनं नेमका काय काय पाहिलं? title=
अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शिंदे सरकारमध्ये झाले सहभागी

Ajit pawar joins eknath shinde led maharashtra government:  महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या राजकीय भूकंपाला 30 जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं. एका वर्षात अनेक राजकीय घडामोडी झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 40 आमदारांसहीत शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांबरोबर शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या 9 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. या शपथविधीमुळे अनेकांना पहाटेचा शपथविधी आठवला तर काहींना वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये पडलेली फूट आठवली. अजित पवार यांनी यंदाच्या आमदारकीच्या 5 वर्षात तिसऱ्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी ही शपथ घेण्याआधी नेमकं काय काय घडलंय पाहूयात...

पहाटेचा शपथविधी

2019 साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत 23 नोव्हेंबर 2019 रोजी भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला. भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळं बहुमत चाचणी आधीच अल्पमतात आलेलं फडणवीस सरकार अवघ्यात साडेतीन दिवसात कोसळलं. अजित पवारांच्या पाठिंब्याने भाजपा बहुमत सिद्ध करु शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजित पवार यांच्या गटाला 12 मंत्रीपदं आणि 15 महामंडळं दिली जातील असं त्यावेळी सांगण्यात येत होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी काही तासांमध्ये राजीनामा दिल्याने सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता.

शरद पवारांना होती कल्पना; फडणवीसांचा दावा

अजित पवारांनी 2019 साली केलेल्या या बंडाची शरद पवारांना कल्पना होती असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली ही गुगली फडणवीस यांना कळली नाही असं म्हणत या दाव्याला उत्तर दिलं होतं. पहाटेचं सरकार पडल्याने राज्यातील राष्ट्रपती राजवट तर उठलीच पण नंतर लगेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली. राष्ट्रवादीबरोबर काँग्रेस आणि मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ अर्धा अर्धा वाटून घेण्यावरुन झालेल्या वादामुळे भाजपावर नाराज असलेल्या शिवसेनेनं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची मोट बांधली.

शिंदे बाहेर पडले

मागील वर्षी म्हणजेच 2022 साली जून महिन्यात पार पडलेल्या विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अचानक तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे काही शिवसेना आमदारांसहीत रातोरात सुरतला पोहोचले. त्यानंतर सुरतमार्गे ते गुवहाटीला पोहोचले. एक एक करत शिवसेनेतील 40 आमदारांनी शिंदेंना पाठींबा देत गुवहाटी गाठली. यानंतरच्या नाट्यमय घडामोडींमध्ये या गटाने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी बहुमतचाचणी घेण्याचे निर्देश दिले. मात्र त्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार पडलं,

शिंदे मुख्यमंत्री झाले

या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे गुवहाटीवरुन गोवा मार्गे मुंबईत आले. भाजपाने मुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या नावाची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर पुढील अनेक महिने सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्हं कोणाला द्यायचं यासंदर्भातील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष रंगला. निवडणूक आयोगासमोरील याचिकेमध्ये आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळालं. त्यामुळेच आता राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार आहे असं सत्ताधाऱ्यांनी सांगण्यास सुरुवात केली.

अजित पवारांचा पुन्हा दे धक्का

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळेंची वर्णी लागल्यापासून नाराज असल्याचं बोललं जात होतं. अजित पवारांनी काही आठवड्यांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये आपल्याला संघटनात्मक काम करायचं असल्याचं म्हटलं होतं. आज सकाळी अजित पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची समज घालण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अजित पवारांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचं ठरवलं. दुपारी अडीचच्या सुमारास राज्यपालांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची तर अन्य 9 आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली.

अजित पवार शिंदे-फडणवीस जवळीक

अजित पवार यांनी अचानक शिंदे सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी मागील बऱ्याच काळापासून अजित पवारांची सत्ताधाऱ्यांबरोबर जवळीक वाढत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अजित पवारांविरोधात सत्ताधाऱ्यांपैकी कोणीही उलटसुलट विधानं करत नव्हतं. तसेच अजित पवारही अनेकदा पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना पहायला मिळाले. अगदी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतल्यानंतरच्या भाषणामध्येही एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलं होतं.