साहित्य संमेलनातील गोंधळ संयोजकांमुळेच - जगन्नाथ पाटील

हा संपूर्ण प्रकार.... 

Updated: Jan 13, 2020, 05:32 PM IST
साहित्य संमेलनातील गोंधळ संयोजकांमुळेच - जगन्नाथ पाटील  title=
साहित्य संमेलनातील गोंधळ संयोजकांमुळेच - जगन्नाथ पाटील

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनात अचानकपणे मंचावर जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप साहित्यिक जगन्नाथ पाटील यांच्यावर झाला. त्यावेळी वार्तांकन करणाऱ्या 'झी २४ तास'च्या प्रतिनिधींनाही त्यावेळी पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. मात्र हा संपूर्ण प्रकार संयोजकांच्या गलथानपणामुळे चुकीच्या नियोजनामुळे झाल्याचा आरोप जगन्नाथ पाटील यांनी केला. 

लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन पाटील यांनी ही बाब स्पष्ट केली. भीतीच्या आणि दहशतीच्या सावटाखाली हे साहित्य संमेलन पार पडल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. जगन्नाथ पाटील हे मूळचे लातूरचे असून त्यांचे आतापर्यंत विविध सामाजिक विषयावरील पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहेत. 

राज्य शासनाने २५ वर्षांपूर्वी पैठण येथे संत पिठाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. ज्यासाठी जागा घेऊन शासनाने करोडो रुपयांचा निधीही दिला. मात्र अद्याप त्या ठिकाणी संत पिठाची स्थापना झालेली नसल्याचा मुद्दा आपण त्या परिसंवाद मांडणार होतो आणि त्याचीच परवानगी घेण्यासाठी मंचावर गेल्याचं ते यावेळी म्हणाले. मात्र संयोजक आणि खाजगी सुरक्षा रक्षकांनी गैरसमज करून आपण गोंधळ घातल्याचा कांगावा केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचे ते यावेळी म्हणाले. 

'झी २४ तास'चे उस्मानाबाद येथील प्रतिनिधी मुस्तान मिरझा यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचाही त्यांनी यावेळी निषेध केला. 'साहित्य संमेलनातील गोंधळाला मला जबाबदार धरले जात आहे. मात्र खरा गोंधळ हा संयोजकांमुळेच झाला. गलथान नियोजन असल्यामुळे हा प्रकार घडला. मी परिसंवादात रीतसर परवानगी घेऊन आपले म्हणणे मांडण्यासाठी गेलो होतो. मात्र बोलू न देता विनाकारण गोंधळ निर्माण केला गेला. झी २४ तासच्या पत्रकाराला झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध आहे', असं ते म्हणाले.