अकोला : तुम्ही कधी जेवायला जेलमध्ये गेलात काय?... जवळपास सर्वांचं उत्तर 'नाही' असंच असेल. पण, अकोल्यात गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांची ही जेलवारी सुरू आहे.
'जेलखाना' हे हॉटेल आहे अकोल्यातील रामदासपेठ भागात. अकोल्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायी केवट बंधूंनी तीन महिन्यांपूर्वी ३ जूलैला हे हॉटेल सुरू केलंय. येथे सारं अगदी जेलसारखंच आहे. येथे तासाची माहिती देणारी घंटा, जेल किचन, शस्त्र मालखाना, बराकी, अंडासेल, दळणाचं जातं असं सर्वच. तर जेलर अन कैद्याच्या वेशातील होटेल कॅप्टन अन वेटरही येथे आहेत आणि हो जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका कारण तुमच्यावर वॉच टॉवरमधील बंदूकधारी लक्ष ठेवून असतो.
केवट बंधूंनी यासाठी रामदासपेठेतील वीस वर्षांपासून बंद असलेला एक जुना बंगला भाड्याने घेतलाय. त्याला तीन महिन्यांत जेलचं स्वरूप देण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतलीय. या बरोबरच देशाप्रती आपलं दायित्व म्हणून केवट यांनी सैनिक आणि त्यांच्या परिवाराकरिता २० टक्के सूटही दिलीय.
या हॉटेलला तीन महिन्यातच अकोलेकरांनी अक्षरश: मोठा प्रतिसाद दिलाय. येथील मेन्यू कार्डातील 'जेलखाना स्पेशल' आणि 'जेलर स्पेशल' ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.
खाण्याच्या वेगवेगळ्या चवीचे आणि वेगवेगळ्या ढंगात चवीचे खाणे हे खरतर महानगरीचे छानछोकीचे जगणं पण अकोल्यातील या जेलखान्याच्या निमित्ताने पारंपरिक चवीला मिळणारं हे नव रुप तुम्हालाही खाते रहो अशी हाळी द्यायला भाग पडेल.