देवा, बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणूदे, चिमुरड्याची आर्त हाक

चिमुकल्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

Updated: Sep 20, 2020, 05:27 PM IST

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : देवा, बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणूदे अशी हाक एका चिमुरड्याने दिलीय. बच्चूभाऊ तुम्ही लवकर बरे व्हा. भाऊंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे.. त्यांना काहीच होऊ देऊ नको अशी देवा पुढे आर्त हाक घालणाऱ्या चिमुकल्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्याच समोर आलं होतं.

महाविकास आघाडीतील राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांना मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. राज्यमंत्री बच्चू कडू हे कोरोना काळातही सातत्याने फिरत आहे. बच्चू कडू हे कोरोनातून लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे कार्यकर्ते प्रार्थना करीत आहे. अशातच बच्चू कडू यांच्या उत्तम स्वास्थ्य साठी एका चिमुकल्याने देखील प्रार्थना केली आहे. 

दरम्यान या चिमुकल्याचा व्हिडिओ बच्चू कडू यांनीसुद्धा त्यांच्या फेसबुक पेज वर शेअर करत. बेटा मला काहीच नाही होणार, औषधी सोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही तु रडला तर मला बर वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो. खुप मोठा हो सेवा कर. अशी पोस्ट देखील त्यांनी केली आहे...

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या पत्नी नयना कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकूण बारा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  

मागील काही दिवसांपासून राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने लोकांच्या संपर्कात येत आहे. अनेक कार्यक्रमाला देखील बच्चू कडू यांनी हजेरी लावली होती. अशातच बच्चू कडूंना थोडा अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली.