जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. वाढदिवसानिमित्त मलकापूरमध्ये आयोजित जाहिर कार्यक्रमात दमानियांवर टीका करताना खडसेंनी अपशब्द वापरल्याचा दमानियांचा आरोप आहे.
एकनाथ खडसेंनी मंत्रीपद सोडलं असलं,तरी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ते चांगलेच दुखावले गेलेत. नुकत्याच मलकापुरात झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्वतःला निर्दोष असल्याचं सांगताना त्यांच्यावर आरोप करणाऱ्या अजंली दमानिया यांच्यावर नाव न घेता आगपाखड केली. दमानियांनी केलेले सगळे आरोप निराधार असल्याचं सांगताना खडसेंची भाषा घसरलीय. या भाषणानंतर आता दमानियांनी आक्षेप नोंदवलाय.