पुणे : महाराष्ट्रातील गडकिल्ले शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवज, मराठा साम्राज्याचा सखोल अभ्यास ज्यांनी केला ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी 5:07 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी सासवड येथे झाला. त्यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक दस्ताऐवज, गडकिल्ले, मराठा सम्राज्याचा अभ्यास केला. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळासोबत सुद्धा त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम केले होते. (मोठी बातमी | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन)
'जेथे दिव्यत्वाच्या प्रचिती तेथे कर माझे जुळती´ या उक्ती प्रमाणेच बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व संयम,चिकाटी, स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता यांनी परिपूर्ण होते. त्यांनी आयुष्यात वक्ताशीरपणा आणि शिस्तबद्धता शेवटपर्यंत पाळली. कुठलाही कार्यक्रम असो अगदी वेळेच्या 2-5 मिनिट आधी बाबांची हजेरी असायची. त्यांनी जे शिवचरित्र लिहिले ते देखील संपूर्ण महाराष्ट्रात गाजले.
नाट्यलेखन, दिगदर्शन सुद्धा त्यांनी केले. जाणता राजा हे नाटक त्यांनी लिहिले. पहिला प्रयोग 14 एप्रिल 1984 रोजी सादर करण्यात आला होता. 19 ऑगस्ट 2015 रोजी त्यांच्या 93 व्या वाढदिवशी त्यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
2019 साली 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासारख्या अनेक लहान मोठ्या पुरस्कारांनी बाबांना सन्मानित करण्यात आले होते. अश्या या दिव्य व्यक्तिमत्वची प्राणज्योत आज अनंतात विलीन झाली एक गाढ्या इतिहास संशोधकाला महाराष्ट्र मुकला.