मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर रक्तदान केलं. हे रक्त थँलेसेमिया रुग्णांना दिले जाणार आहेत. आता तर हातात दंडुका आला असल्यानं तीच आक्रमकता कायम राहिल, परंतु कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.
महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांना राज्यमंत्रिपद मिळालं. बच्चू कडू हे अपंग आणि रुग्णांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवतात. काही दिवसांपू़र्वी अपंग आणि रुग्ण यांना सोईचे होईल अशा प्रकारचे मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर कार्यालय आणि शेजारील बंगल्याची मागणी केली होती. पण त्यांना ते मिळाले नाही. यावर त्यांनी अधिकाऱ्यांवर आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे.
पण बच्चू कडू यांना स्मशानभूमीजवळ निवासस्थान मिळाल्याने यावकर देखील चर्चा रंगली होती. पण याला महत्त्व न देता प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आम्ही इथपर्यंत आलो व पुढेही काम करतच राहणार असं बच्चू कडूंनी म्हटलं होतं. हेमा मालिनींच्या बंगल्या जवळ निवास स्थान असावं अशी मागणी आम्ही केली नव्हती. शिवाय मंत्रालयात दालन देण्याऐवजी विविधिमंडळात दिलं गेलं आहे. मंत्रालयात पहिल्या मजल्यावर जर दालन दिलं असतं तर माझ्याकडे येणाऱ्या अपंग बांधवांना तिथे येण्यास सोयीचं झालं असतं.' अशा प्रकारे त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर लोकनेते बच्चू कडू यांनी लगेचच कामाला सुरुवात केली. बच्चू कडू यांनी दर्यापूरमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची अक्षरशः झाडाझडती घेतली होती. यावेळी त्यांनी कामचुकारपणा करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना इंगा दाखवला. लोकांची कामे वेळेत न करणाऱ्या दोन नायब तहसीलदारांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.