औरंगाबादच्या संत एकनाथ नाट्यगृहाची दुरावस्था

नाट्यरसिक, नाट्यकलावंतांमध्ये नाराजी...

Updated: Dec 5, 2019, 08:19 PM IST
औरंगाबादच्या संत एकनाथ नाट्यगृहाची दुरावस्था title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादचं संत एकनाथ नाट्यगृह म्हणजे नाट्यवर्तुळात औरंगाबादकरांची जणू ओळखच. मात्र ३ वर्ष मरणयातनापेक्षा जास्त कळा सोसलेलं हे नाट्यगृह दोन वर्षांपासून मरणासन्न आहे. याच्या डागडुजीचे काम सुरु आहे, मात्र त्याची गती पाहता आणि दोन वर्ष हे सुरु होणार नाही असंच चित्र दिसंतय. नाट्यरसिक, नाट्यकलावंत यामुळे चांगलेच वैतागले आहेत.

औरंगाबादच्या संत एकनाथ नाट्यगृहात गेल्या २ वर्षांपासून डागडुजीचे काम सुरु आहे. २०१७ मध्ये याच नाट्यगृहात प्रशांत दामले यांचा नाटकाचा प्रयोग असतांना त्यांनी नाट्यगृहाच्या अवस्थेचे जाहीर धिंडवडे काढले होते, आणि त्यानंतर प्रचंड लोकक्षोभापुढे नंतर हे नाट्यगृह डागडुजीसाठी बंद झालं, आता यालाही २ वर्ष उलटली.

पहिल्यांदा आवाज उठवणारे तेच प्रशांच दामले आज पुन्हा त्याच नाट्यगृहात आल्यावर असलेली बकाल परिस्थिती पाहून हताश झाले. अजूनही काम सुरुच आहे, अवस्था न पाहण्यासारखी, कामाची गती म्हणजे फक्त काम सुरु असल्याचा बोर्ड, काम करणारं कुणीच दिसत नाही. ज्या नाट्यगृहात अनेक चांगली नाटकं केली त्याची अवस्था पाहून वाईट वाटतं असं दामले म्हणाले.

गेली दोन वर्ष शहरातील नाट्यकर्मीसुद्धा हे दालन सुरु व्हावं, काम लवकर व्हावं म्हणून प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांना कुणीही जुमानत नाही. कुणाकडे जावून रडावं अशी म्हणायची वेळ आली असल्याचं कलावंत हताशपणे सांगतात.

सभागृह महापालिकेच्या ताब्यातील, महापालिकेकडे पैसैच नसल्याने कामाची कासवगती कायम आहे. महापौर मात्र काम सुरु आहे, लवकर होईल असं सांगून नेहमीसारखी वेळ मारून नेण्यातच धन्यता मानतात.

नाट्यगृहाची अवस्था दयनीय आहे, यासारखंच संत तुकाराम नाट्यगृहही बंदच पडलंय, त्यामुळं शहरात नाटक वा अन्य सांसकृतिक कार्यक्रम करण्यासाठी परवडणारी जागाच नाही असं चित्र आहे. लोकांना जगण्यासाठी निवारा, पाणी हवं असतं, तसं सांस्कृतिक कार्यक्रमही आयुष्याचा एक भाग आहे. मात्र औरंगाबाद महापालिकेला हे पटत नाही, म्हणूनच अजूनही हेच चित्र कायम आहे.