विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीड जिल्ह्यामध्ये एकूण 129 ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. यापैकी अठरा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर 111 ग्रामपंचायतीसाठी काल मतमोजणी झाली. यामध्ये तब्बल 572 महिलांनी विजय नोंदवलाय. त्यामुळे आता या 119 गावांमध्ये सर्वाधिक 572 महिला प्रतिनिधित्व करणार आहेत.
त्यामुळे जिल्ह्यामध्ये हा आकडा पहिल्यांदाच इतका मोठा असल्याचे पाहायला मिळाले. आरक्षणानुसार 526 जागा होत्या. मात्र 46 जागा अधिक जिंकून आरक्षणाशिवाय आम्ही निवडून येऊ शकतो, हे बीड जिल्ह्यातील महिलांनी दाखवून दिले. बीड तालुक्यात सर्वाधिक 130 महिला सदस्य म्हणून निवडून आल्या त्यातील बहुतेक महिला या शिवसेनेच्या आहेत.
त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक सदस्यांमध्ये महिलांचा बोलबाला आहे. मात्र या महिला मिरवणूक किंवा सत्कार समारंभात दिसत नाहीत. त्यामुळं निवडणून आल्याने त्यांनी आता नेतृत्व करायला हावा अन्यथा निवडून येऊन फक्त नावालाच प्रतिनिधित्व मिळेल त्यासाठी आता महिलांनी सक्षम पणे गावाचा कारभार पाहिला पाहिजे.
बीड जिल्ह्यातील विशेषता बीड विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेने मोठेच संपादन केलेला आहे. यामध्ये 130 महिला निवडून आलेले आहेत. त्यामुळे महिलांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत येथील मतदारांनी महिलांना निवडून आणून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या महिला निश्चितच आपल्या आपल्या गावांमध्ये चांगलं काम करतील असा विश्वास शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागातील निवडणुकीमध्ये महिलांना मोठे यश मिळालं आहे. मात्र महिला प्रत्यक्षात मात्र समोर दिसत नाही. हारतुरे घेताना किंवा जल्लोष यामध्ये महिला दिसलेल्या नाहीत. त्यामुळे आता निवडून आलेल्या महिलांची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांच्यावर जी मतदारांनी जबाबदारी दिलेली आहे. ती त्यांनी पाळावी जर निवडून आलेल्या महिलांनी प्रयत्न केले. तर गावाचा त्या चेहरामोहरा बदलू शकतील असं मत पत्रकार सोनाली शहाणे यांनी व्यक्त केलंय.