कर्नाटक प्रशासनाकडून ८ दिवसात महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन

बेळगावच्या मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे प्रकरण आता स्थानिक प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आले आहे.

Updated: Aug 9, 2020, 09:18 PM IST
कर्नाटक प्रशासनाकडून ८ दिवसात महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या प्रकरणानंतर आता कर्नाटक प्रशासनाकडून 8 दिवसात परवानगी देऊन पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 8 दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही तर 9व्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार असल्याचा निर्णय पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

बेळगावच्या मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे प्रकरण आता स्थानिक प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या घटनेनंतर बेळगावसह महाराष्ट्रातील शिवभक्त प्रचंड संतापले होते. रविवारी सकाळपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांत कर्नाटक सरकारचा निषेध केला जात आहे. या सगळ्याची दखल घेत आता मनगुत्ती येथील स्थानिक प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्याची मागणी केली होती. सर्व कायदेशीर बाबी तपासून पुतळा बसवू, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कर्नाटकातील या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये उमटत आहेत. मुंबईतही शिवसेना भवनाबाहेर आक्रमक निदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारविरोधात घोषणा देत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावरुन पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचे समजते.