मुंबई : महाराष्ट्राचे 19 वे राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांनी नुकतीच राज्यपाल पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे मुळचे उत्तराखंडचे असलेल्या कोश्यारी यांनी ही शपथ मराठीतून घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी भगत सिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.मुख्य सचिव अजोय मेहता यांनी कोश्यारी यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती यांच्या आदेशाचे वाचन केले. राजभवन इथे संध्याकाळी हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्याचे विविध मंत्री, आमदार तसंच उत्तराखंडचे मंत्रीही उपस्थित होते.
नवनियुक्त राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारली, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नंद्रजोग आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/zioS9af8JG
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 5, 2019
महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर दोन दिवसांपुर्वी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना राजभवनावर भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमानंतर लगेचच राज्यपाल सपत्निक हैदराबादकडे रवाना झाले.
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल हे भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. उत्तराखंड राज्य अस्तित्वात आल्यानंतर कोश्यारी हे भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर एका वर्षासाठी त्यांनी मुख्यमंत्रीपदही भूषवले. 2009 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेवर खासदार म्हणून होते.
दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून तर हिमाचलचे विद्यमान राज्यपाल कलराज मिश्रा यांना राजस्थानात पाठवण्यात आलं आहे. काँग्रेसचे माजी नेते मोहम्मद अरीफ खान हे केरळच्या राज्यपालपदी तर तमिलसाई सुंदरराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.