शासकीय वसतिगृहातल्या मुलींना भाजयुमोच्या नेत्याची दहशत

राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याच बीड जिल्ह्यात शासकीय वसतिगृहात राहणा-या मुली आणि गृहपाल दहशतीखाली जगतायत. 

Updated: Sep 17, 2017, 09:04 PM IST
शासकीय वसतिगृहातल्या मुलींना भाजयुमोच्या नेत्याची दहशत title=

बीड : राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याच बीड जिल्ह्यात शासकीय वसतिगृहात राहणा-या मुली आणि गृहपाल दहशतीखाली जगतायत. भारतीय जनता युवा मोर्चाचा उपाध्यक्ष अनिल चांदणे यानं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या मुली आणि गृहपाल यांनी केलाय.

बीड शहरातल्या शिवाजी चौकात असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील खासगी सुरक्षारक्षक महिलेसह अश्लील चाळे करताना या भाजयुमोच्या पदाधिका-याला रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. यानंतर वसतिगृहातील मुली आणि महिला गृहपाल यांनी पोलिसांत तक्रार दिली. याचा राग आल्यानं चांदणे याने धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप गृहपालसह वसतिगृहातल्या मुलींनी केलाय.

मंत्र्यांच्या जवळचा असून मंत्री आपल्या खिशात आहेत असं सांगत या पदाधिका-याने थेट घरी येऊन धमकावण्यास सुरुवात केल्याचं या मुलींनी म्हटलंय. याप्रकरणी तक्रार केली असता पोलिसांकडून अदखलपात्र तक्रार घेत चांदणे याला पाठिशी घातले जात असल्याचा आरोप होतोय.

मंत्र्याच्या नावाने सुरु असलेल्या या दादागिरी, गुंडगिरीमुळे वसतिगृहातील मुली आणि त्यांच्या पालकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांनी कॅमे-यापुढे बोलण्यास नकार दिलाय.