मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

रांजणगाव येथील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.

Updated: Oct 31, 2022, 04:50 PM IST
मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा title=

मुंबई : फॉक्सकॉन वेदांता (Vedanta-Foxconn) आणि टाटा-एअरबस (Tata-Airbus) सारखे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याने शिंदे सरकारवर (Shinde Government) विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. पण रांजणगाव इलेक्ट्रॉनिक हब (Ranjangaon Electronic Hub) बनवण्यासाठी केंद्राने 500 कोटी रुपयांच्या मेगा प्रकल्पाला मंजुरी दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळालाय.

राज्यात नव्याने येणारे तीन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राजकीय वातावरण तापले होते. पण केंद्र सरकारने महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मँन्युफँक्चरिंग क्लस्टर प्रोजेक्ट (Maharashtra Electronic Manufacturing Cluster Project ) अंतर्गत नविन प्रकल्प येणार असल्याची घोषणा केलीये. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव (Ranjangaon) औद्योगिक वसाहतीतील टप्पा क्रमांक 3 अंतर्गत कर्डे येथे 300 हेक्टर वर हे नविन प्रकल्प येत आहेत.

रांजणगावातील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर इतके महत्त्वाचे का?

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) ने 2,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, येत्या काही वर्षांत हजारो नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता येथे आहे.

"महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब बनवण्यासाठी, आम्ही रांजणगाव, पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प मंजूर केला आहे. सरकारची एकूण गुंतवणूक सुमारे 500 कोटी रुपये असेल," असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी एका ब्रीफिंगमध्ये सांगितले.

रांजणगाव (महाराष्ट्र) तमिळनाडू, नोएडा आणि कर्नाटक सारखे राज्य इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून उदयास येण्यासाठी तयार आहेत. ईएमसीच्या विकासासाठी एकूण खर्च 492.85 कोटी रुपये आहे, त्यापैकी 207.98 कोटी रुपये भारत सरकार आणि उर्वरित 284.87 कोटी रुपयांचे योगदान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), राज्य औद्योगिक एजन्सीद्वारे दिले जाईल.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी आधीच्या ठाकरे सरकारवर टीका देखील केली आहे. 'गुंतवणूक तेव्हाच येते, जेव्हा कायदा-सुव्यवस्था चांगली असेल. गेल्या 2.5 वर्षात काय झाले, हे अवघ्या देशाला ठावूक आहे. आम्ही येणाऱ्या दोन वर्षात महाराष्ट्राला उद्योगात नंबर 1 चे राज्य बनविणार.' असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आणि महाराष्ट्रात उभारण्यात येणारा टाटा-एअरबस सी-295 वाहतूक विमान प्रकल्प गुजरातमध्ये का गेला, असा सवाल केला होता. तर हा प्रकल्प महाविकासआघाडी सरकारच्या काळातच गुजरातमध्ये गेल्याची टीका सरकारमधील नेत्यांनी केली होती.