By Election! चिंचवडमध्ये तिरंगी लढत निश्चित, ठाकरेंच्या मनधरणीनंतरही राहुल कलाटेंची माघार नाहीच

चिंचवड पोटनिवडणूक रंगतदार होणार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे निवडणूक लढवण्यावर ठाम

Updated: Feb 10, 2023, 03:37 PM IST
By Election! चिंचवडमध्ये तिरंगी लढत निश्चित, ठाकरेंच्या मनधरणीनंतरही राहुल कलाटेंची माघार नाहीच title=

पुणे :  चिंचवड पोटनिवडणूक (Chinchwad By Election) आता तिरंगी लढत होणार हे निश्चित झालं आहे. पोटनिवडणुकीतील अर्ज माघे घेण्यासाठी अखेरचा एक तास शिल्लक असताना मविआ नेत्यांची (Mahavikas Aghadi) चिंचवडमध्ये धावाधाव सुरू केली. पण राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर राहुल कलाटे ठाम आहेत. राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांची ठाकरे गटाने मनधरणी केली. सचिन अहीर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला. आज कलाटे यांनी सकाळी उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली. 

राहुल कलाटे यांचं राजकीय भवितव्य उज्वल आहे. त्यांच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू असं आश्वासन त्यांना शिवसेना नेत्यांनी दिलंय. मात्र कलाटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर माघार न घेण्याचं निश्चित केलं आहे. 

काय म्हणाले राहुल कलाटे
उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे माघार घेण्याबद्दल माझ्याशी बोलले, त्यांच्या प्रती मी आदर व्यक्त करतो, पण चिंचवडच्या जनतेतून मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय. कोणत्याही परिस्थितीत तू लढलं पाहिजे, मागच्या निवडणुकीत देशामध्ये भाजपाची लाट होती, महापालिकेत सत्ता होती, राज्यात सत्ता होती, असं असतानाही इथल्या एक लाख 12 हजार लोकांनी मला मतं दिली होती. त्यामुळे यावेळीही प्रत्येकाचं एकच मत होतं, राहुल कलाटे यांनी निवडणूक लढली पाहिजे, असं राहुल कलाटे यांनी सांगितलं

जनतेची लोकभावना, जनतेचा असलेला पाठिंबा यांच्या जीवावर मी निवडणुकीला सामोरं जात आहे. चिंचवड मतदारसंघात तिरंगी लढत होणार नाही, माझा एकतर्फी विजय होईल, असा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला. ज्या पद्धतीने इथे तिकिट वाटप झालं, त्यामुळे माझ्याबद्दल सहानभूती निर्माण झाली आहे. अचानक नुरा कुस्ती का खेळली गेली, याची जनतेच्या मनात चीड आहे, असं राहुल कलाटे यांनी म्हटलंय. 

चिंचवडमध्ये तिरंगी लढत
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने अजित पवारांच्या खास मर्जीतील नेते म्हणून ओळखले जाणारे नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपला सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यातच राहुल कलाटे अपक्ष म्हणून निवडणूक लढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन वाढलं आहे. राहुल कलाटे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 1 लाख 12 हजार मतं मिळवली होती.