मुंबई : दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
हलक्या सरींचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमालाची काळजी घेण्याची गरज आहे. दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे आज आणि उद्या राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि तापमानात घट होणार आहे.
या दोन दिवसांत हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या काळात गारपीट अथवा वादळाची शक्यता नाही. मात्र, शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.
या काळात बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींमुळे गहू आणि आंबा मोहोर यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.