'फक्त मीच जबाब देणार नाही तर..'; ED समोर चौकशीला जाण्याआधी किशोरी पेडणेकरांचं सूचक विधान

Kishori Pednekar On Covid Body Bag Scam Case: कोरोना कालावधीमध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोव्हिड बॉडी बॅग घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत आल्या आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 8, 2023, 01:04 PM IST
'फक्त मीच जबाब देणार नाही तर..'; ED समोर चौकशीला जाण्याआधी किशोरी पेडणेकरांचं सूचक विधान title=
ईडीने दिलेल्या समन्सबद्दल प्रसारमाध्यमांकडे नोंदवली प्रतिक्रिया

Kishori Pednekar On Covid Body Bag Scam Case: कोरोना काळामध्ये मुंबईच्या महापौरपदी असलेल्या किशोरी पेडणेकर यांना आज कोव्हिड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याआधी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आपण ईडीला सर्व सहकार्य करणार असून आज चौकशीसाठी हजर राहणार आहे असं पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

फक्त मीच जबाब देणार नाही तर...

ईडीकडून आलेल्या समन्सबद्दल बोलताना किशोरी पेडणेकर यांनी, "यंत्रणांकडून चौकशीसाठी मला समन्स आले आहेत. आता सरकारी यंत्रणांमध्येही राजकारण घुसलं असलं तरी त्यांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. मुंबईची महापौर म्हणून मी कोरोना काळात केलेलं काम संपूर्ण जगाने पाहिलं आहे," असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना या प्रकरणामध्ये उत्तर केवळ आपल्याला द्यावं लागणरा नाही तर सर्वांनाच द्यावं लागेल असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. "जवाब तो देनाही पडेगा! पण फक्त मीच जबाब देणार नाही तर सर्वांनाच तो द्यावा लागेल," असं सूचक विधान माजी महापौरांनी केलं.

छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन...

तसेच पुढे बोलताना किशोरी पेडणेकर यांनी, आपण कधीच कुठलं चुकीचं काम केलेलं नाही हे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊ सांगू शकतो असंही म्हटलं आहे. "मी थोडीही विचलीत होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला आहे. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मी जे सांगेन ते खरं सांगेन. मी कधीही कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही. हेच त्रिवार सत्य आहे," असेही किशोरी पेडणेकर यांनी ईडीसमोर चौकशीला उपस्थित राहण्याआधी म्हटलं.

दबाव निर्माण करायचा आणि स्वतःची कामं करून घ्यायची

अनेकांवर आरोप झाल्यानंतर ते लोक आज मंत्रीपदावर असल्याचा उल्लेखही किशोरी पेडणेकर यांनी केला. आम्ही काम करत असताना कोणी घोटाळा केला असेल तर तो समोर आलाच पाहिजे असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. "आजपर्यंत भरपूर लोकांवर आरोप झाले ते मंत्री झाले. जे खरं आहे ते बाहेर येऊ दे असं मला वाटतं. आम्ही काम करत असताना कोणी घोटाळा केला असेल तर ते समोर आलंच पाहिजे," असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. "मी सुद्धा मागणी करेल पण फक्त आरोप करून दबाव निर्माण करायचा आणि स्वतःची कामं करून घ्यायची, हे असं चालणार नाही," असेही किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x