Madha Loksabha : पवारांचा 'एक डाव धोबीपछाड', माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी उधळला गुलाल, 'इतक्या' मतांनी विजय

Madha Lok Sabha election Results : सोलापूरच्या माढातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे विजयी झालेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करत मोहिते यांनी बाजी मारलीये. 

सौरभ तळेकर | Updated: Jun 5, 2024, 12:13 AM IST
Madha Loksabha : पवारांचा 'एक डाव धोबीपछाड', माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी उधळला गुलाल, 'इतक्या' मतांनी विजय title=
Dhairyasheel Mohite Patil Won in Madha Lok Sabha election

Dhairyasheel Mohite Patil : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात (Madha LokSabha) धैर्यशील मोहिते पाटील यांनी दमदार विजय मिळवला आहे. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीत मोहिते पाटलांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा 120837 मतांनी पराभव केलाय. माढ्यात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात शह-काटशह पहायला मिळाला होता. अशातच धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील मोहिते पाटील घराण्याची ताकद दाखवली आहे. एवढंच नाही तर शरद पवारांनी मोहिते पाटलांना उमेदवारी देऊन सोलापूर, बारामती आणि माढा या जागेवर शिक्कामोर्तब केला होता. अशातच आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयानंतर शिवरत्न बंगल्यावर जल्लोष पहायला मिळतोय.

महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील चौदाव्या फेरी अखेर 55 हजार 940 मतांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर अकलूजमधील त्यांच्या शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप करत जल्लोष केला. चौदाव्या फेरीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लावला जाणार, यावर शिक्कामोर्तब झालं. अखेर मोहिते पाटलांनी 120837 मतांनी विजय मिळवला आहे. थेट शरद पवारांविरुद्ध लढण्याची ताकद ठेवणाऱ्या मोहिते पाटलांनी भाजपच्या निर्णयावरून कूस बदलली अन् शरद पवार यांच्याशी हातमिळवणी केली. पवारांनी मोहिते पाटलांना तिकीट दिलं अन् पश्मिच महाराष्ट्रातील आपली प्रतिमा कायम ठेवली आहे.

सोलापुरात मोहिते पाटलांची हवा

आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांचा पराभव करण्याच्या उद्देशाने मोहिते पाटील यांनी आपली ताकद काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभी केली. बीडचं पार्सल माघारी पाठवणार असा शब्दच मोहिते पाटलांनी दिला होता. त्यामुळे राम सातपुतेंचा सोलापुरात दारूण पराभव झाल्याचं पहायला मिळतंय. 

माढाचं राजकीय गणित

आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर एकदा भाजपचा खासदार माढ्यामधून विजयी झालाय.. 2009 साली शरद पवारांनी बारामतीऐवजी माढ्यामधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यांनी भाजपच्या सुभाष देशमुखांचा 3 लाख मतांनी पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेतही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले. त्यांनी स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत यांना केवळ २५ हजारांच्या मताधिक्यानं हरवलं. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपची वाट धरली. 2019 मध्ये भाजपनं उमेदवार बदलला... मोदी लाटेत रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या संजयमामा शिंदेंचा ८५ हजार मतांनी पराभव केला. सध्या विधानसभेत राष्ट्रवादीचे 2, भाजपचे 2, शिवसेनेचा 1 आणि अपक्ष 1 असे सगळे महायुतीचे आमदार आहेत.