स्वंयघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक, भक्त महिलेवर अत्याचाराचा आरोप

भक्त महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लोमटे महाराजला पंढरपूरमधून अटक केली आहे. 

Updated: Aug 16, 2023, 04:55 PM IST
स्वंयघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजला अटक, भक्त महिलेवर अत्याचाराचा आरोप title=

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : दर्शनासाठी आलेल्या भक्त महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे (Eknath Maharaj Lomate) याला येरमाळा पोलिसांना अटक केली आहे .न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रुचून लोमटे महाराजाला पंढरपूरमधून (Pandharpur) अटक केली आहे. श्री शेत्र दत्त मंदिर संस्थांचे सर्वेसर्वा तसंच भाविकांच्या सर्व समस्येवर वर उपाय करणारा अशी स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज याची ख्याती पसरवण्यात आली होती.  28 जुलै 2022 रोजी मलकापूर इथं 35 वर्षांची एक महिला लोमटे महाराजाच्या दर्शनसाठी आली होती. लोमटे महाराजने या महिलेला प्रवचन खोलीत बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार (Rape) केला.

या घटनेनंतर मंदिर परिसरात प्रचंड गोंधळ उडाला होता. लोकांचा संताप पाहून लोमटे महाराजने घटनास्थळावरुन पळ काढला.  पीडित महिलेच्या तक्रारीवरून महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात लोमट महाराजला अटक ही झाली होती पण त्यानंतर त्याची जामीनवर सुटका झाली. याविरोधात पीडित महिलेने न्यायालयामध्ये दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करत पोलिसांना त्याला अटक करण्यात आदेश दिले होते. त्यानुसार लोमटे महाराजाला अटक करण्यात आली आहे. कळंब न्यायालयाने लोमटे महाराज याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. लोमटे महाराजावर या पूर्वीही जादूटोणा आणि लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल आहेत.

कोण आहे लोमटे महाराज
एकनाथ सुभाष लोमटे असं या महाराजचं नाव आहे. तो स्वत: ला राष्ट्रसंत म्हणवून घेतो. आपल्याकडे दैवी शक्ती असूनज आजारी व्यक्ती आणि भक्ताला तो बरं करतो, अशी त्याची ख्याती आहे. लोमटे महाराज फक्त जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात त्याचे मोठ्या प्रमाणात भक्त आहेत. विशेष म्हणजे राज्यात वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेतेही लोमटे महाराजचे भक्त आहेत. लोमटे याच्या अटकेमुळे राजकीयच नाही तरधार्मिक क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. लोमटे महाराजाविरुध्द इतरही काही तक्रारी असतील तर त्याचाही तपास केला जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराजांनी किती महिलांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले. 

लोमटे महाराजने अनेक महिलांना ब्लॅकमेल केल्याचं बोललं जातंय. व्हिडिओ काढून ठेवल्याचं सांगून बलात्कार केल्याची ही गंभीर प्रकरणे त्याच्या विरोधात आहेत. यातील एका प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर लोमटे महाराज फरार झाला होता.