Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? असा सवाल गेल्या 7 महिन्यांपासून विचारला जातोय. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याच काकांविरोधात बंड पुकारलं अन् राष्ट्रवादीत उभी दरी निर्माण झाली. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय. अजितदादांनीच शरद पवारांना (Sharad Pawar) चेकमेट दिलाय, अशी चर्चा होताना दिसते. मात्र, तुम्हाला माहितीये का? संपत्तीच्या बाबतीत देखील अजित पवाराच 'दादा' ठरले आहेत.
अजित पवारांची संपत्ती किती? (Ajit Pawar Net Worth)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2019 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा तपशील दिला होता. त्यानुसार, त्यांच्याकडे एकूण 75.48 कोटी रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. अजित पवार यांच्याकडे 23.75 कोटी रुपयांची चल आणि 51.75 कोटींची अचल संपत्ती आहे. त्यापैकी त्यांच्या कुटुंबाकडे 2.65 कोटी रुपयांची शेतजमीन, 16.45 लाख रुपयांची बिगर शेती जमीन आणि 21.78 कोटी रुपयांचे निवासी घर, 10.85 कोटी रुपयांची व्यावसायिक मालमत्ता असल्याचं त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्यावर 3.73 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली होती.
उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना शासनाकडून दरमहा 3 लाखापर्यंत पगार तसेच मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता आणि सुविधा दिला जातो. सुनेत्रा पवार यांच्या नावे 47 कोटींहून अधिक रकमेची मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेमध्ये पुण्यातील 20 ठिकाणच्या जमिनी, चार निवासी इमारती व एक कर्मशियल इमारत आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.
शरद पवार यांची संपत्ती किती? (Sharad Pawar Net Worth)
ज्यावेळी शरद पवार यांनी 2020 मध्ये राज्यसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी संपत्तीविषयी माहिती दिली होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 32.73 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सहा वर्षात शरद पवारांची संपत्ती केवळ 60 लाखांने वाढल्याचं पहायला मिळतंय. शरद पवार यांच्याकडे 25.21 कोटी चल आणि 7.72 कोटींची अचल संपत्ती आहे.