गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : जैन धर्मात अहिंसेची शिकवण दिली जाते. अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन धर्मियांमध्ये (Jain Communitie) तुफान हाणामारी झाली आहे. जैन धर्मियांची काशी अशी ओळख असलेल्या वाशिमच्या(Washim) शिरपूरमध्ये जैन धर्मियांमध्ये जोरदार राडा झाला. जैन धर्मियांचे 23वे तिर्थनकार भगवान पार्श्वनाथ यांच्या शिरपूरमधील मंदिरावरून श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांमध्ये धुसफूस आहे. शनिवारी दर्शन रांगेत दोन्ही पंथियांमध्ये वाद झाला. त्यातून एकाला मारहाण करण्यात आली.
या हाणामाराचे आज पुन्हा पडसाद उमटले. श्वेतांबर पंथियांनी दुपारी शिरपूरमध्ये निषेध रॅली काढली. यादरम्यान श्वेतांबर आणि दिगंबर पंथीय आमने सामने आले आणि त्यांच्यात पुन्हा हाणामारी झाली.
वाशिम जिल्ह्यातील जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या शिरपूर इथं जैन धर्मियांचे 23 वे तिर्थनकार भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरासाठी श्वेतांबर आणि दिगंबर या दोन पंथीयांचा वाद 42 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबीत होता. 22 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयानं सदर मंदिर उघडण्याचा अधिकार श्वेतांबर पंथीयांना दिला. त्यानंतर 11 मार्च रोजी मंदिर उघडण्यात आलं या वरून श्वेतांबरी आणि दिगंबरी पंथीयांमध्ये धुसफूस सुरू आहे.
दरम्यान, शनिवारी दर्शन रांगेत दोन्ही पंथियांमध्ये वाद होऊन एकाला मारहाण करण्यात आली होती.त्याचे पडसाद आज पुन्हा उमटले असून काल च्या घटनेतील आरोपीवर कारवाई करावी यासाठी श्वेताम्बरी पंथीयांनी आज दुपारी 3 च्या सुमारास शिरपूर मध्ये निषेध रॅली काढली.त्याच दरम्यान श्वेताम्बरी पंथिय आणि दिगंबरी पंथिय हे समोरा समोर आले असता त्या दोन्ही पंथीयांमध्ये वाद विकोपाला जाऊन पुन्हा हाणामारी झाली. त्यानंतर दिगंबरी धर्मियांमध्ये रोष निर्माण झाला.
हाणामारीसाठी जबाबदार असलेल्या वर कारवाई करण्यासाठी मूक मोर्चा काढत पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या दिला. या घटनेमुळं शिरपूर मध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला होते.
जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे भगवान पार्श्वनाथांची ओळख आहे मात्र मंदिर वादावरून जैन धर्मीयांच्या दोन पंथीयांमध्ये वाद होत आहेत. या वादाची सर्वत्र चर्चा होत असून सध्या शिरपूर जैन येथे तणाव पूर्ण शांतता आहे. मंदिरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर इथं जैन धर्मियांचे 23 वे तिर्थनकार भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिराचा वाद न्यायालयात 42 वर्षांपासून प्रलंबीत होता. मंदिर खुले करण्यासाठी आणि मूर्ती लेप करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम आदेश देण्यात आला. 11 मार्चला श्वेताबंरी पंथीयां कडे मंदिराच्या चाव्या प्रशासनाने दिल्या. यानंतर साफसफाई करून श्वेताबंरी पंथीयांनी मंदिराला कुलूप लावलं. मूर्ती लेपाचा अधिकार श्वेताबंरी पंथीयांना दिला असल्याने याला 50 ते 60 दिवस लागण्याचं कारण देत मंदिर बंद करण्यात आले. दर्शनासाठी मंदिर खुलं व्हावं यांसाठी 13 मार्च रोजी दिगंबरी पंथीयांनी धरणे आंदोलन केले. तसेच 14 मार्च रोजी दिगंबरी पंथीयांनी मंदिराचा दरवाजा उघडून प्रवेश मिळविला. यामध्ये श्वेताबंरी पंथीयांचा मंदिर दरवाजा चुकीच्या पद्धतीने उघडल्याचा आरोप केला. दिगंबरी पंथीयांनी मोठ्या संख्येनं भगवान पार्श्वनाथाचं दर्शन घेतले. 14 मार्च रोजी श्वेताबंरी पंथीयांनी चुकीच्या पद्धतीनं दरवाजा उघडणाऱ्यावर कारवाईची मागणी पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानं 15 मार्च रोजी श्वेताबंरी पंथिय आणि त्यांचे मुनी यांनी मंदिर परिसरात अन्नत्याग आणि धरणे आंदोलन केले. त्यानंतर ही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानं 16 मार्च रोजी श्वेताबंरी पंथीयांनी जैन मंदिर ते पोलिस स्टेशन पर्यंत मोर्चा काढला. यावेळी प्रशासनानं चौकशी करून कारवाई करू असं मोर्चे कऱ्यांना सांगितलं.त्यानंतर ही दोन्ही पंथीयांचं मंदिरात पूजा, दर्शन सुरू होते.