मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत गोंधळ, आंदोलकांच्या 2 गटात वाद

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत 2 गटामध्ये गोंधळ

Updated: Jul 24, 2018, 04:35 PM IST
मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत गोंधळ, आंदोलकांच्या 2 गटात वाद title=

मुंबई : मराठा आंदोलकांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या आंदोलनाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगली प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद आणि नांदेडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी कारवाई देखील केले. असं असलं तरी आज झालेल्या बैठकीत शाळा, काॅलेज बंद ठेवण्यावरून दोन गटात वाद झाल्याचं समोर आलं आहे. याआधी निघालेला मराठा क्रांती मोर्चा अतिशय शांत आणि अहिंसात्मक होती. पण आज या आंदोलनाला हिंसक वळण लागल्य़ाने आणि यामुळे शाळा, महाविद्यालय बंद ठेवावी लागल्यामुळे आंदोलनातील एका गटाने नाराजी व्यक्त केली आहे.

अनेक ठिकाणी आंदोलकांनी रास्तारोको केला. रस्त्यावर टायर जाळले. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलना दरम्यान पोलिसांवर जमाव चालून आल्याने पळताना पोलीस कॉन्स्टेबलचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. लक्ष्मण पाटगावकर असं पोलीस कॉन्स्टेबलांचं नाव आहे. औरंगाबादमध्ये त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आलं पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिली. या दरम्यान पळत असताना आणखी एक पोलीस खाली पडल्याने जखमी झाले आहेत.

मराठा आरक्षणासाठी आज पुकारलेल्या बंद आंदोलनाला मराठवाड्यातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यातील सर्व आगारांच्या एसटी बस बंद आहेत, शाळा आणि महाविद्यालयं बंद आहेत.