मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर गीता जैन यांनी छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वाटप आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात स्थानिक नगरसेविका रुपाली मोदी आणि त्यांच्या पतीनं वाद घातला. शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. हाटकेश भागात राहणारे इम्रान हाश्मी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
रस्त्यावर टेबल खुर्च्या मांडून छत्री वाटप सुरू होतं. पाऊस आल्यानं शेजारीच ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलेल्या शेडमध्ये कार्यक्रम हलवण्यात आला. त्यानंतर नगरसेविका रुपाली मोदी पतीसह तिथे पोहोचल्या. हा शेड नगरसेवक निधीतून बांधल्याचं सांगत त्यांनी कार्यक्रमात विघ्न आणलं. क्षुल्लक कारणावरून रुपाली मोदी यांनी केलेल्या राड्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपमधला अंतर्गत संघर्ष या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आला आहे. माजी महापौर गीता जैन या विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर रुपाली मोदी या भाजप आमदार नरेंद्र मेहता समर्थक आहेत.