रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : पाण्यासाठी जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांनी पायी दिंडी सुरू केली आहे. दुष्काळग्रस्तांनी जत ते मंत्रालयापर्यंत ही पायी दिंडी काढली आहे. या पायी दिंडीच आज मिरजेत आगमन झाले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दुष्काळग्रस्त पुढे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. पाण्यापासून वंचित असणाऱ्या जत तालुक्यातील 46 गावांनी या पायी दिंडीच आयोजन केले आहे.
सांगलीतील दुष्काळी जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या 46 गावांतील लोकांनी अनोखे आंदोलन सुरू केले आहे. पायी दिंडी सुरू करून, पाण्याचा कायमचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार या दुष्काळग्रस्तांनी केला आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जवळपास 100 टॅंकर तालुक्यात सध्या पाणी पुरवठा करत आहेत. तर म्हैसाळ सिंचन योजनेतून तालुक्यात थोड्या प्रमाणात पाणी पोहोचले आहे. मात्र पूर्व भागातील 46 गावं आजही पाण्यापासून वंचित आहेत. या ठिकाणी कोणतीही सिंचन योजना पोहोचलेली नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यातून पाणी देण्याबाबत प्रयत्न सूर्य होते मात्र त्याबाबत ही ठोस निर्णय झाला नाही.