प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य होतो सरपंच, या गावातील सरपंचपदाचा पॅटर्न चर्चेत

सात महिन्यांनंतर येथील सरपंच देतात राजीनामा. पाहा कुठे आहे हे अनोखं गाव. 

Updated: Aug 21, 2022, 07:26 PM IST
प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य होतो सरपंच, या गावातील सरपंचपदाचा पॅटर्न चर्चेत title=

चंद्रशेखर भूयार, बदलापूर : प्रत्येक निवडणुकीनंतर त्या त्या संस्थेतील सर्वोच्च पदावर जाण्यासाठी मोठी स्पर्धा असते. मग ते देशाचे पंतप्रधानपद असो वा ग्रामपंचायतीचे सरपंच पद. मात्र या सर्व स्पर्धेला आणि घोडेबाजाराला रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबनाथ तालुक्यात असलेल्या ढोके दापिवली ग्रामपंचायतीने अनोखा मार्ग काढला आहे. ज्याची सगळीकडेच चर्चा आहे.

9 सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत दर सात महिन्यांनी सरपंच बदलला जातो. त्यामुळे प्रत्येक सदस्याला सरपंचपदावर विराजमान होण्याची संधी मिळते आहे. या ढोके दापिवलीच्या सरपंच पॅटर्नची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

प्रत्येक जण सात महिन्याचा सरपंच

बदलापूर शहराजवळ असलेली ढोके दापिवली ही ग्रामपंचायत सध्या आपल्या या निर्णयामुळे चर्चेत आहे. ढोके दापिवली, आंबेशिव खुर्द या ग्रामपंचायतीत निवडून आलेला प्रत्येक सदस्य सरपंच पदावर विराजमान होतो. ग्रामपंचायतीत नऊ सदस्य आहेत. मात्र प्रत्येक सात महिन्यांनंतर येथील सरपंच राजीनामा देतो. त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकाची बिनविरोध सरपंचपदी निवड केली जाते.

नुकतीच ढाके दापिवलीच्या सरपंचपदी माधुरी भोईर तर उपसरपंचपदी नितीन गायकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. आतापर्यंत २१ महिन्यात या ग्रामपंचायतीत ३ सदस्यांनी सरपंचपद भूषवले आहे.