नाशिक : खासगी तंत्रनिकेतनमधील शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक काम अनिवार्य आहे. उच्च न्यायालयाने आज हे आदेश दिले आहेत. खासगी संस्था, विनाअनुदानित संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक काम अनिवार्य आहे असं न्यायालयाने म्हटलं आहे. नाशिक शहरातील केके वाघ या खासगी पॉलिटेक्निकमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांनी निवडणुकीच्या कामाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
खासगी पॉलिटेक्निक विनाअनुदानित असले तरी ते राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येते. त्यामुळे त्यांना निवडणुकीचे काम करावेच लागेल, असं कोर्टाने म्हटलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संस्थेच्या शिक्षकांना निवडणुकीचं काम लावण्यात येणार होतं. पण याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक आयोगाच ताण कमी झाला आहे. निवडणुकीच्या कामासाठी यामुळे निवडणूक आयोगाला या कर्मचाऱ्यांकड़ून देखील काम करुन घेता येईल.