मुंबई : पुण्यातील फिरोदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धेत संवेदनशील विषय सादर करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. हे निर्बंध आता मागे घेण्यात आले आहेत. आयोजकांनी हे निर्बंध मागे घेतले असून प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवेदन देण्यात आले आहे.
फिरोदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धेत संवेदनशील विषय सादर करण्यावर निर्बंध आयोजकांनी लावले होते. आयोजकांचा हा निर्णय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची प्रतिक्रिया स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत होती.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, संवेदनशीलतेला लाभलेलं सांस्कृतिक व्यासपीठ म्हणजे फिरोदिया करंडक. मात्र, यंदा हा करंडक वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. यंदा हिंदू-मुस्लीम, जम्मू-काश्मीर, अनुच्छेद ३७०, राममंदिर, असे विषय एकांकिकेसाठी निवडण्यास मनाई करण्यात आली होती. हे विषय सादर केल्यास धार्मित तसेच जातीय तेढ निर्माण होण्याची भीती आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली होती.
तर दुसरीकडे, विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असावं अशा प्रतिक्रिया कॉलेजमधील कल्चरल ग्रुपमधून व्यक्त होत होती. फिरोदिया करंडक स्पर्धेसाठी जारी करण्यात आलेल्या नियमावली संदर्भात नाट्यक्षेत्रातील मानयवरांकडून देखील प्रतिक्रिया उमटत होती. थेट विषय निवडीवर निर्बंध घालण्याऐवजी सेंसॉरशिपचा अवलंब करावा अशीही एक मागणी होत होती. त्यामुळे या नियमावलीवर पुन्हा एकदा विचारमंथन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. अखेर या विषयनिवडीवरील निर्बंध आयोजकांनी मागे घेतले आहेत.
45 वर्षांचा इतिहास असलेल्या फिरोदिया करंडक स्पर्धेत पहिल्यांदाच पुढील सादरीकरणासाठी पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत पहिल्यांदाच विनोदी सादरीकरणासाठी सांघिक पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेच्या निकषांत बसल्यास प्रथम, द्वितीय, तृतीय या सांघिक क्रमांकात किंवा स्वतंत्र पारितोषिक म्हणूनही विचार केला जाऊ शकतो, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.