पैशांसाठी त्यांची अशी चतुराई, चार दिवसात उभी राहिली भली मोठी आमराई

ये पैसा बोलता है, पैसा कुणाला नको असतो? पण, पैशांसाठी ही झाडं लावण्याची कथा मस्तच आहे.  

Updated: Apr 11, 2022, 10:04 PM IST
पैशांसाठी त्यांची अशी चतुराई, चार दिवसात उभी राहिली भली मोठी आमराई title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद-पैठण रस्त्यावर गेवराई तांडा हे सर्वात छोटे गाव. या गावाला पूर्वेकडून बायपास रस्ता करण्यात येणार आहे. थोडक्यात या गावाचा विकास होणार आहे. म्हणजे हे गाव आता हायवेवर नसेल.

गेवराई तांडा गावापेक्षा मोठे असलेल्या गावांना बायपास केलेले नाही. विशेष म्हणजे गेवराई तांडा गावात अतिक्रमणे नाहीत, वाहतूक कोंडी होणारे रस्ते नाही. फार गजबजलेलं गाव नाही, तरीही या गावाला बायपास केलंय.

औरंगाबाद-पैठण रस्ता सध्या 100 फूट रुंद संपादित जागेत दोन पदरी आहे. आता चारपदरी करण्यासाठी अधिकची 50 फूट जागा संपादित करायची आहे. मात्र, जिथे बायपास करायचे आहेत तिथे पूर्ण 150 फूट रुंद जागा संपादित करावी लागणार आहे. 

गेवराई तांड्यामधून जाणारा सध्याचा रस्ता सरळ आहे. इथे बायपास केल्यास रस्त्याची लांबी एक किलोमीटरने वाढेल. तर, बायपास करण्यासाठी 10 हेक्टर जमीन संपादित करावी लागेल. बायपास न करता गेवराई तांड्यातूनच रस्ता पुढे नेल्यास अवघे 10 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. म्हणजे बायपासमुळे रस्त्याची लांबीही वाढणार आहे आणि पर्यायाने खर्चही वाढणार आहे.

औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाची अधिसूचना निघाली आणि मोठे बिल्डर, काँट्रॅक्टर आणि राजकारणी शेत जमिनीचा अधिक मोबदला मिळेल म्हणून सक्रिय झाले. धक्कादायक म्हणजे रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत नोटिफिकेशन निघण्याच्या केवळ 15  दिवस आधी जमीन खरेदी करण्यात आली. 

त्यापेक्षाही अधिक धक्कादायक म्हणजे भर उन्हाळ्यात आणि ऐन उष्णतेच्या लाटेत मोठमोठ्या आंब्याच्या फळझाडांची लागवड खरेदी करण्यात आलेल्या जागेत करण्यात आली. अधिक मोबदला लाटण्यासाठी जमीन धारकांनी जी जमीन रस्त्यात जाणार आहे त्यावर ही आमराई अवज्ञा कार ते पाच दिवसात उभी केलीय.

आता ज्या जमीनवरून हायवे जाणार आहे, तिथं आंब्याची झाड का लावली याचं उत्तर म्हणजे, आंब्याची झाड अधिग्रहित करत असताना मावेजा म्हणजे मोबदला अधिक मिळतो. झाडाचे पैसे देताना झाडाचं आत्ताच असलेलं वय आणि भविष्यात किती काळ त्याचं फळ मिळू शकतो. 

त्यावेळी त्याची काय किंमत असेल हे सगळं पकडून मावेजा दिला जातो. त्यामुळे कधीकधी जमिनीच्या पैशापेक्षा झाडाचे पैसे अधिक मिळतात. म्हणजेच गेल्या चार-पाच दिवसात उभ्या राहिलेल्या या अमराईतील आंब्याच्या झाडाला आता पैसै लागणार आहेत.

शासनाची अशा पद्धतीने फसवणूक करताना बहुतेक वेळा त्यात अधिकारीही सामील असतात. विशेष म्हणजे या बड्या लोकांच्या जमिनीसाठी राष्ट्रीय महामार्गाची दिशा बद्दलल्याचा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केलाय. 

जिथं झाडं लावली आहे, ती जागा एका मोठ्या कंत्राटदारानं महिनाभरापूर्वीच विकत घेतली आहे. तर, याच जमिनीच्या आधी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भावाची जमीन आहे. या लोकांना फायदा होण्यासाठीच हा बायपास उभारत असल्याचं गावकरी सांगतायत. येत्या 24 तारखेला गडकरी याचं भूमिपुजन करणार आहेत. मात्र, त्यांच्या लक्षात हे सगळं आलं तर हा घोळ थांबेल का? कारण, याला विरोध करण्यासाठी गावकरी आता एकवटत आहेत.