जळगाव: लग्नसराईच्या आधी सोने खरेदीला मोठी तेजी आल्याचं सराफ बाजारात पाहायला मिळत आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावातही सोन्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी सराफांच्या दुकानात तुफान गर्दी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी सराफांनी मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना संसर्ग टाळण्याच्या गाईडलाईन्स पाळत 5 ते 10 ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी दुकानात सोडण्यात आलं आहे.
जळगावात आज गुरु पुष्यामृत योगावर सोने खरेदीसाठी वेग आला आहे. गुरु पुष्यामृत योग हा 6 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. गुरु पुष्यामृत योगावर सोनं खरेदी ते अक्षय असते त्यामुळे लक्ष्मीचे प्रतीक म्हणून सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं असा समज आहे. त्यामुळे या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांची सराफ दुकानात गर्दी होते.
लगीन सराईच्या मुहूर्तावर आणि आजचा योग असे दोन्ही मिळून आज सराफ दुकानात ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ-उतारामुळे सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
2021 या वर्षाचं आर्थिक बजेट सादर झाल्यानंतर सोन्याचे दर कमी झाले. त्यानंतर आता सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सराफ बाजारात दर घसरल्यामुळे खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या आठवड्यातील सोन्याचे दर
गुरूवार 46464
बुधवार 46522
मंगळवार 46802
सोमवार 46901