जालना शहरात घरफोड्यांचे सत्र; ६ लाखांहून अधिक किंमतीचे दागिने जप्त

२०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त

Updated: May 25, 2019, 05:55 PM IST
जालना शहरात घरफोड्यांचे सत्र; ६ लाखांहून अधिक किंमतीचे दागिने जप्त title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालना शहरात घरफोड्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेक लोक बाहेरगावी जात असतात. याचाच फायदा घेत घरफोड्यांच्या संख्येत अधिक वाढ होताना दिसत आहे. जालना शहरात घरफोड्या करुन सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या ३ अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई करत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जालना शहरासह परीसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर आता पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून ६ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे २०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दागिने जप्त केल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दियासिंग कलाणी, अर्जुनसिंग कलाणी, किसनसिंग टाक अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. गुन्ह्यात सहभागी असलेले तीनही आरोपी शहरातील नवीन मोंढा परिसरात थांबले असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.