बोगस तलवारबाजांचा सरकारी नोकऱ्यांवर डल्ला! राज्यात आणखी एक घोटाळा उघड

राज्यात नोकरभरतीत सुरू झालेली घोटाळ्यांची मालिका संपता संपत नाहीयेत, आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे

Updated: Feb 12, 2022, 06:01 PM IST
बोगस तलवारबाजांचा सरकारी नोकऱ्यांवर डल्ला! राज्यात आणखी एक घोटाळा उघड title=
प्रतिकात्मक फोटो

Fake Certificate Scam : राज्यात शिक्षक भरती, पोलीस भरतीमध्ये घोटाळ्यांची मालिका सुरु आहे. अशातच आता बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवून अनेकांनी सरकारी नोकऱ्या लाटल्यांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

तलवारबाजीत चॅम्पियन असल्याचं सांगत 14 जणांनी पोलीस आणि कर विभागात नोकरी मिळवली आहे. यातील 7 जण फौजदार पदावर आहेत तर 7 जण करनिरीक्षक आहेत. याबाबत क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी 30 सप्टेंबर 2021 रोजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना अहवाल पाठवलाय. 

तलवारबाजी संघटनेचे महासचिव अशोक दुधारेंनी या सर्वांची प्रमाणपत्र सत्य असल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्याचं या अहवालात म्हटलं आहे. अशोक दुधारेंनी मात्र आपल्या सहीचा दुरूपयोग झाल्याचं सांगत बोगस प्रमाणपत्रात आपला कोणताही सहभाग नसल्याचं म्हंटलं आहे.  राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. 

याआधीही राज्यात ट्रंपोलिन खेळाचे तब्बल 281 बोगस खेळाडू सापडले होते. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर राज्यात अस्तित्वात नसलेल्या आईस हॉकीचेही दीडशे खेळाडू आढळले होते. या प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच आता तलवारबाजीचे बोगस खेळाडूही सरकारी पदांवर असल्याचं समोर आलंय.

हे 14 सरकारी बाबू कोण? त्यांना ही बोगस प्रमाणपत्रं कुणी दिली? यामागे कुणा-कुणाचा हात आहे? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.