सांगली : संबंधित लोकप्रतिनिधींना एखाद्या कार्यक्रमाला किंवा पाहणी दौरा, बैठकीला निमंत्रण पाठवणे, हा एक शिष्टाचार असतो. मात्र आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील या सांगली जिल्ह्याच्या कारभारावर नाराज आहेत. कारण याबाबतीत त्यांच्याशी दुजाभाव तर केला जात नाहीय ना? असा सवाल उपस्थित होत आहे. यासोबत आज आर. आर. पाटील हयात राहिले असते, तर सांगली प्रशासनातले अधिकारी असं वागले असते का? असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी सांगतील बैठक घेतली होती, त्या बैठकीला सुमनताई अनुपस्थित राहिल्या. सुमनताई यांच्या अनुपस्थितीचीही चांगलीच चर्चा आहे. सुमनताई आपण बैठकीला अनुपस्थित का होता? असं विचारल्यावर त्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या आहेत.
सुमनताई पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगलीत येऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला साधं निमंत्रणही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलं नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून विरोधी पक्षाच्या आमदारांना सापत्न वागणूक मिळतेय, दुष्काळाच्या व्यथा प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांना काय कळणार, असा प्रश्न देखील सुमनताई पाटील यांनी केलाय.