'दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर दारं उघडली असती'

 निर्णयाला मुदतवाढ देण्यास महाविकास आघाडी सरकार टाळाटाळ करत असल्याची टीका 

Updated: Aug 31, 2020, 12:43 PM IST

मुंबई :दारूची दुकाने उघडून मिळाला तसा महसूल मंदीर उघडून मिळाला असता तर मंदिराची दारे कधीच उघडली असती असा टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावलाय.  मंदिरात ज्यांचा श्वास घुसमटतो आणि नाईट लाईफच्या नावाने खुलतो त्यांची वृत्तपत्रे मंदीरे उघडण्याबाबत उदासीन असतील तर नवल ते काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. 

कोरोनाबाबत उपचार करण्यासाठी राज्यातील खाजगी रुग्णालयातील खाटा राज्य सरकारने ताब्यात घेणे आणि उपचाराचे दर नियंत्रित ठेवणे या निर्णयाची मुदत आज संपत आहे. याला मुदतवाढ घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेत नाहीयेत. तेव्हा याबाबत निर्णय घ्यावा नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

हा निर्णय घ्यायला २२ मे चा मुहूर्त राज्य सरकारने काढला होता. म्हणजेच लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सरकारने उशिराने निर्णय घेतला होता. आता या निर्णयाला मुदतवाढ देण्यास महाविकास आघाडी सरकार टाळाटाळ करत असल्याची टीका भाजपने केली आहे.

राज्यात काल एका दिवसात कोरोनाचे १६,४०८ रुग्ण वाढले आहेत, तर २९६ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे ७,६९० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५,६२,४०१ एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ७२.०४ टक्के एवढा झाला आहे. 

राज्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ७,८०,६८९ एवढी झाली आहे. यापैकी १,९३,५४८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत २४,३९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या १३,०९,६७६ जण होम क्वारंटाईन असून ३५,३७३ संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत ४०,८४,७५४ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.