राज्यात अनेक ठिकाणी उद्योग संकटात

१२८७ उद्योग घटक बंद पडले

Updated: Nov 26, 2018, 05:33 PM IST
राज्यात अनेक ठिकाणी उद्योग संकटात title=

विशाल करोळे, औरंगाबाद : राज्यात अनेक ठिकाणी उद्योग संकटात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या औद्योगिक आणि निमऔद्योगिक वसाहतींतले एकूण १२८७ उद्योग घटक बंद पडले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली आहे. मराठवाड्यातील आमदारांनी या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर उद्योगमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. औरंगाबादची औद्योगित वसाहत ही राज्यातली एक मोठी औद्योगिक वसाहत आहे. हजारो हातांना इथं काम मिळतं. मात्र आता सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसारच गेल्या काही वर्षात औरंगाबादेमध्ये एकूण 1287 उद्योग घटक बंद पडले आहेत. इलेक्ट्रोप्लेटिंग, पावडर कोटिंग आणि प्लास्टिक उद्योगासह मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगांना याचा फटका बसला आहे.  

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 3 हजार 236 उद्योग घटक बंद आहेत. त्यातील 1287 उद्योग घटक पुर्णपणे बंद पडल्याची माहिती आहे. औरंगाबादेत एकूण 2326  उद्योग घटकांमध्ये 1847 कोटी 42 लाख रुपयांची गुंतवणूक आहे आणि या उद्योगांमधून 4907 जणांना रोजगार मिळाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उद्योग घटकांवर अवलंबून असेलेली उद्योगांची संख्या 13820 आहे आणि त्यामध्ये 1 लाख 42 हजार 555 जणांना रोजगार मिळाला आहे. मोठे उद्योग अडचणीत आलेत आणि त्यामुळं लहान उद्योगांना धोका निर्माण झाल्याचं ज्येष्ठ उद्य़ोजकांचे म्हणणं आहे.

सरकार योजना चांगल्या जाहीर करतं मात्र त्यांची अंमलबजावणी नसल्यानं उद्योग संकटात आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणंय. या पद्धतीनं उद्योग बंद पडत असल्याची ही आकडेवारी धक्कादायक आहे, यातून विभागाच्या विकासावर सुद्दा थेट परिणाम होवू शकतो त्यामुळं सरकारनं सुद्धा फक्त आकडेवारी जाहीर करून चालणार नाही, तर उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण कऱण्याची गरज आहे.