आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीला अटक

आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र बनवून दोन हजार रुपयांत विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 

Updated: Jan 2, 2019, 05:14 PM IST
आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र विकणाऱ्या टोळीला अटक  title=

जालना : आयटीआय अर्थात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या ट्रेडचे बनावट प्रमाणपत्र बनवून दोन हजार रुपयांत विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघाना अटक केली आहे. त्यांच्यावर बदनापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालनाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

भगवान खांडेभराड आणि संतोष मनभरे हे दोघे आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र तयार करत आणि केवळ दोन हजार रुपयांत विकत होते. बदनापूरमधील एका फोटो स्टुडिओत आयटीआयचे प्रमाणपत्र बनवून ते दोन हजार रुपयांत विक्री केले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला.

फोटो स्टुडिओच्या मालकासह आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. बनावट प्रमाणपत्र बनवून अनेकांची फसवणूक केल्याचे देखील प्रथमदर्शनी तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी फोटो स्टुडिओमधून संगणक, स्कॅनर आणि प्रिंटरसह अन्य साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांनी दिली.