मुंबई : मुंबईच्या नायर रूग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. डॉ. पायल तडवीच्या शवविच्छेदन अहवालात पाठीवर व्रण असल्याचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही. मात्र तिच्या गळ्याला व्रणाचा उल्लेख करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी पायलच्या पाठीवर मारहाणीचे व्रण असल्याचा दावा न्यायालयात केला होता. मात्र या दाव्यावर नितीन सातपुते ठाम असून कनिष्ठ डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी तिघी आरोपी डॉक्टरांना १ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग प्रमुख, मार्डचे सदस्य, पदाधिकारी, महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जबाब नोंदवण्यासाठी आग्रीपाडा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतले आहे. या वेळी तीन संशियांतापैकी एक असलेल्या डॉ. भक्ती मेहेर हिला देखील पोलिसांनी अटक करून चौकशी सुरू केली. दरम्यान संपूर्ण प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे.
श्रमजीवीच्या महिला ठिणगी युवती कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोस्टर, बॅनर घेऊन धडक मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांवर कडक करवाई करून त्यांना वेळीच निलंबीत करावे, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी लावून धरली.जिल्ह्यातील आदिवासी, दलित युवती येथील जांभळीनाका येथे एक येऊन त्यांनी दुपारी हा धडक मोर्चा काढला. या युवती टेंभीनाका, सिव्हील रूग्णालय, सेंट्रल मैदान या मार्गाने येथील शासकीय विश्रामगृहाजवळ तो अडवण्यात आला. या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन महिला ठिणगीच्या या युवतींना शासनास सज्जड दम देऊन सुरक्षेची जोरदार मागणी केली.