Karul Ghat Traffic: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करुळ घाट 22 जानेवारीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. रस्ता दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने या घाट 22 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
रस्ता मजबुतीकरण व दुपदरीकरणाच्या कामासाठी करूळ घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. २२ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान सुमारे अडीच महिने घाटातील वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने आता पर्यायी मार्गाने वाहतुक वळवण्यात येणार आहे.
करुळ घाटातील वाहतुक तरळे – फोंडाघाट – राधानगरी – कोल्हापूर, प्रवासी वाहतूकीसाठी तरळे – भुईबावडा – कोल्हापूर या पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसंच, प्रवासी व अवजड वाहतुकीसाठी तरळे – वैभववाडी – अनुस्कुरा – कोल्हापूर या मार्गाने वाहतुक करावी, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. पर्यायी वाहतुकीचे मार्ग समजतील यासाठी दिशादर्शक फलक, वाहतुक संकेत चिन्हे लावण्याचे व उभारण्याचे काम करावे, असेही आदेश पत्रात लिहण्यात आले आहेत.
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटाचे मजबुतीकरण व रुंदीकरण काम सुरु करण्यात आले आहे. तर लवकरच रस्ता कॉक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या मार्गावर एकेरी वाहतूक चालु ठेवणे शक्य नाही. त्यामुळं अपघाताची भीती वर्तवण्यात येत होती. घाटातील रस्ता सात मीटर रुंदीचा आहे. तसंच, तीव्र चढउतार व वेडीवाकडी व धोकादायक वळणे आहेत. अवजड वाहने, ट्रेलर यांची वर्दळ घाटातून जास्त असते. त्यामुळं या भागात एकेरी वाहतूक सुरू ठेवणे शक्य नाही ते धोकादायक ठरते.
तरेळे – गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक १६६ जी) मार्गावरुन करुळ घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवास करताना पर्यायी मार्गाचा वापर करावा. 21 मार्चपर्यंत हा घाट प्रवाशांसाठी बंद असणार आहे.