जगात भारी कोल्हापुरी : चहासोबत कपाची न्याहारी

कोल्हापुरकरांचा नादंच खुळा.... 

Updated: Feb 11, 2021, 07:48 PM IST
जगात भारी कोल्हापुरी : चहासोबत कपाची न्याहारी  title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : चहा किंवा कॉफीसाठी हल्ली सर्रास डिस्पोझिबल कप वापरले जातात. मात्र कागद किंवा प्लास्टिकच्या या कपांमुळे कचरा आणि प्रदुषणात भर पडते. कोल्हापूरच्या तीन होतकरू तरुणांनी यावर एक मस्त पर्याय शोधला आहे. या पर्यायाची जोरदार चर्चा रंगली आहे. कोल्हापुरकरांचा नादंच खुळा.... हे म्हणतात ते काही खोटं नाही. 

चहा पिऊन झाल्यानंतर कप खाऊन टाका. गोंधळलात ना? कोल्हापुरच्या तरुणांनी बनवला बिस्किटाचा कप. यामुळे आता चहा पिऊन झाल्यावर कप कचरा कुंडीत नाही तर चक्क खाऊन टाकायचा आहे. कचरा नको अन् प्रदुषणापासून मुक्ती मिळावी यासाठी या तरूणांनी ही भन्नाट कल्पना अंमलात आणली आहे. 

  कोणत्याही चहाच्या स्टॉलवर दिसणारं साधारण चित्र म्हणजे चहा पिऊन फेकून द्यायचे कप . कागदी किंवा प्लास्टिकच्या कपमुळे कचरा होतो, प्रदुषण होतं. हे बदलण्यासाठी कोल्हापुरच्या दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.  त्यांनी बिस्किटचा कप तयार केला आहे त्यामुळे चहा पिऊन झाल्यानंतर कप खाऊन टाकला की झालं.

एखाद्याला चहा झाल्यावर कप खायचा नसेल, तर तो भटक्या जनावरांना देता येऊ शकेल. अगदी तो कप टाकून दिला, तरी त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. इतरत्रही असे प्रयोग झालेत. मात्र तिथं कपाची किंमत 7 ते 8 रुपये आहे. कोल्हापुरचे ते मित्र मात्र 3 रुपयात बिस्किटचा कप देत आहेत. 

लवकरच खाण्यायोग्य प्लेट आणि बाऊल बनवायचाही त्यांचा मानस आहे. आताच्या त्यांच्या उपक्रमाला ग्राहकांनीही खूप चांगला  प्रतिसाद दिला आहे. सध्या हे त्रिकुट शहरातल्या स्टॉल्स आणि हॉटेल्समध्ये या बिस्किट कपाची माहिती देतायत. मात्र अद्याप त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे त्यांना सध्या थोडा तोटा सहन करावा लागतो आहे. अनेक चहावाल्यांना त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर कप मोफत दिले आहेत. मात्र आता हळूहळू ऑर्डर यायला सुरूवात झाली आहे. त्यांनी धीर सोडलेला नाही. भविष्यात लोकांनाही अशा कपांचीच सवय होईल, असा त्यांना विश्वास आहे.