रत्नागिरी : गणपती उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांचे कोकण रेल्वेने चांगलेच तीनतेरा वाजवले आहेत.आज सकाळी पुन्हा एकदा तळ कोकणातून नेत्रावती एक्सप्रेस गाडी हाऊसफुल्ल होऊन आली.
नेत्रावती एक्सप्रेस गाडी हाऊसफुल्ल झाल्यामुळे रत्नागिरीतील स्थानकावर आल्यानंतर गाडीचे आतून दरवाजेच उघडले गेले नाहीत. त्यामुळे प्रवासी चांगलेच संतापले होते. जी परिस्थिती रत्नागिरी स्थानकावर होती तीच परिस्थिती चिपळूण, खेड स्थानकावर पाहायला मिळाली.
वारंवार सांगून देखील आतून दरवाजा उघडला जात नव्हता. एक दरवाजा उघडला गेला मात्र आतमध्ये शिरायला देखील जागा नव्हती. तसेच आरपीएफचे जवान देखील जाग्यावर नसल्या कारणाने प्रवाशाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
आज जशी परिस्थिती झाली तशीच परिस्थिती काल तुतारी एक्सप्रेस आणि कोकणकन्या एक्सप्रेसबाबत देखील झाले आहे. दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात येतात आणि परतीच्या प्रवासात असेच हाल सोसतात.