कोरेगाव भीमाचा लढा पेशव्यांविरोधात नव्हता? नव्या पुस्तकावरून नवा वाद

काय आहे 1818 च्या कोरेगाव भीमा लढाईचं सत्य?

Updated: Jan 18, 2022, 08:33 PM IST
कोरेगाव भीमाचा लढा पेशव्यांविरोधात नव्हता? नव्या पुस्तकावरून नवा वाद  title=
संग्रहित फोटो

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : कोरेगाव भीमातला विजय स्तंभ म्हणजे इंग्रज सैन्याकडून लढताना भीमपराक्रम गाजवणाऱ्या महार सैनिकांच्या शौर्याची गाथा सांगणारा ऐतिहासिक वारसा. या लढाईत इंग्रजांचा विजय झाला आणि मराठ्यांचा पराभव. मात्र हे वास्तव नाही. कोरेगाव भीमाची लढाई पेशव्यांच्या विरोधात नव्हती, असा दावा '१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव' या नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे जयस्तंभाचे इन्चार्ज जमादार खंडोजी माळवदकर यांचे सातवे वंशज असलेल्या अॅड. रोहन जमादार माळवदकर यांनी हे नवं पुस्तक लिहिलं आहे.

पुस्तकात काय लिहिलंय? 
1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा परिसरात इंग्रज आणि मराठा सैन्यात लढाई झाली. इंग्रजांचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टॉटनकडे होते. बॉम्बे नेटिव्ह इन्फन्टरी, मद्रास आर्टिलरी आणि पूना ऑक्सिलरी हॉर्स या पलटणी इंग्रजी सैन्यात होत्या. त्यांच्या सैन्यात विविध जाती धर्माचे सैनिक होते. 

मराठा सैन्यातही विविध जाती धर्माचे सैनिक होते. ही लढाई पेशव्यांच्या विरोधात नव्हती. ती केवळ एक अचानक झालेली चकमक होती. ब्रिटिशांनी स्वतःचा बचाव केला आणि तसा उल्लेखही जयस्तंभावर आहे. तरीही जाती अंताच्या नावाखाली समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने कोरेगावच्या लढाईचा खोटा इतिहास मांडला जातो, असा दावा अॅड. माळवदकर यांनी केला आहे.

'जनतेच्या डोळ्यात धूळफेक करु नका'
दरम्यान, कोरेगाव भीमाची लढाई पेशव्यांविरुद्धच लढली गेली होती. आता चुकीचा इतिहास लिहून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू नये, अशी टीका रिपब्लिकन खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे.

अॅड. रोहन माळवदकर यांच्या पुस्तकाच्या रुपानं नवा इतिहास मांडण्यात आला आहे. मात्र १८१८च्या या लढाईचं सत्य काय यबाबत अजूनही मतंमतांतरं कायम आहेत.