Kyrgyzstan Conflict : मागील काही दिवसांपासून किर्गिझस्तानामध्ये असणारं तणावाचं वातावरण आणखी गंभीर वळणावर पोहोचलं असून, आता या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. किर्गिझस्तानात प्रामुख्यानं दक्षिण आशियाई आणि त्यातही पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाराच्या घटना वाढल्या असून या परिस्थितीमध्ये तिथं असणाऱ्या भारतीय, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी तातडीनं प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांसह राज्यातील मंत्रीमहोदायंनी देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे.
किर्गिझस्तानातील वातावरण चिघळत असल्याची बाब समोर येताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी तिथं असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंत्रणांकडे मदतीचं आवाहन केलं. बिश्षेक (किर्गिझस्तानची राजधानी) इथं राज्यातील आणि बीडमधील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास असून, तिथं काही स्थानिकांनी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांवर हल्ले केल्यामुळं या भागात प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची पोस्ट X च्या माध्यमातून मुंडे यांनी केली.
सध्याच्या घडीला महाराष्ट्रातून जवळपास 500 विद्यार्थी किर्गिझस्तानात वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी वास्तव्यास असून, तिथं ते हिंसाचारामुळं उदभवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतात, अशी स्पष्ट माहिती हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या पत्रकातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय प्रशासनाकडून सदर प्रकरणावर लक्ष ठेवलं जात असून, किर्गिझस्तानमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना Bishkek इथं सुरक्षित स्थळी थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला स्थानिक शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांना पुढील महिन्यापर्यंत भारतात आणलं जाईल असं सांगितलं जात आहे.
भारताचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संघर्षाची ठिणगी पडलेल्या किर्गिझस्तानात अडकलेल्या विद्यार्थ्यांनी तिथं असणाऱ्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावं असं आवाहन केलं आहे.
पाकिस्तानातील 'जिओ न्यूज'नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इजिप्तमधील मुलींची छेड काढल्याच्या प्रकरणानंतर इथं तणाव वाढू लागला. 13 मे रोजी इथं इजिप्तमधील काही मुलींची छेड काढण्याची धक्कादायक घटना घडली होती. किर्गिझस्तानातील स्थानिकांनी इजिप्तच्या मुलींची छेडछाड केल्याच्या प्रकरणानंतर परिस्थिती विकोपास गेली आणि इजिप्तच्या विद्यार्थी विरुद्ध स्थानिक विद्यार्थी असे दोन गट पडले. पाहता पाहता संघर्षानं हिंसेचं स्वरुप घेतलं. जिथं स्थानिक विद्यार्थ्यांनी पारिस्तानी विद्यार्थ्यांसह इतर राष्ट्रांच्या विद्यार्थ्यांवरही हल्ले करण्यास सुरुवात केली.