पुणे : जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील मर्सडीज बेंज कंपनीत बिबट्या शिरला. कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.कंपनीच्या Q2 या शेडमध्ये काल रात्री उशीरा हा बिबट्या शिरला होता. तब्बल १२ तास बिबट्या मर्सडीज कंपनीत होता.
बिबट्याचा १२ तासांचा तो धुमाकूळ थरार सगळ्यांनी अनुभवला. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. कंपनीच्या सर्व कामगारांना गेट बाहेर काढण्यात आलं होतं.
वन विभागानं शर्थीचे प्रयत्न करुन बिबट्याला पकडलं. माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रांची रेस्क्यू टीम आणि चाकण वनविभागानं बिबट्या जेरबंद केला.
बिबट्या मर्सिडीज बेंज कंपनी मधील बॉडी शॉपमध्ये असल्याची प्राथमिक माहिती. पहाटेच्या सुमारास कंपनीच्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर ही बाब समोर आली.
मात्र हा बिबट्या कंपनी आवारात कुठून आणि कसा आला हे अद्याप समजू शकलेलं नाही.
यापूर्वी जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, जुन्नर याभागात बिबट्या शेतात तर कधी कोंबड्याच्या खुराडयात, विहिरीत बिबट्या आढळून आला आहे. एवढं नव्हे तर पाळीव प्राण्यांना फस्त करण्याबरोबरच, लहानमुलांसह नागरिकांवरही हल्ले केले आहेत.
याबरोबरच पुण्यातील कात्रज बोगद्या येथेही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. जिल्ह्यातील भौगोलिक वातावरण तसेच उसाच्या शेतीमुळे मागील काही वर्षात बिबट्याचा अधिवास वाढला आहे