Breaking News LIVE Updates: बदलापूर अत्याचार प्रकरणात चार्टशीट दाखल; वकीलांची मोठी मागणी

Maharashtra Breaking News Live: महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील राजकारण, समाजकारणाबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE Updates: बदलापूर अत्याचार प्रकरणात चार्टशीट दाखल; वकीलांची मोठी मागणी

20 Sep 2024, 09:01 वाजता

कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरुपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने सोमवारपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश देऊन डॉ. रानडे यांना तात्पुरता दिलासा दिला आहे.

20 Sep 2024, 08:26 वाजता

...म्हणून पुण्यात पॅराग्लायडिंग, ड्रोन, हेलिकॉप्टर उड्डाण बंदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौराच्या पार्श्वभूमीवर 26 आणि 27 सप्टेंबर रोजी खाजगी अवकाश उड्डानांना मनाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोन आणि इतर खाजगी हेलिकॉप्टर आणि विमान अवकाश उड्डाणांवर बंदीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

20 Sep 2024, 07:31 वाजता

नागपूरमधील गणपती विसर्जन मिरवणुकीत 11 महिला भाजल्या

उमरेडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत फटाक्यामुळे 11 महिला भाजल्याची दुर्घटना घडली आहे. विसर्जन मिरवणुकीत फटाके आतिषबाजी सुरू असताना ही दुर्घटना घडली. गर्दीत असुरक्षित पद्धतीने ही फटाक्यांची ही आतिषबाजी सुरू असताना दुर्घटना घडली. काही महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. फटाक्यांची मोठी आतिषबाजी करताना परवानगी घेतली नव्हती व सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाही करण्यात आल्या नसल्याचही माहिती पुढे येत आहे.

20 Sep 2024, 07:28 वाजता

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतून 300 मोबाईल चोरीला

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरीच्या अनेक घटना असून गणपती मिरवणुकीदरम्यान 300 जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्यात. नाशिकमध्ये पकडलेल्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीकडून हजारोच्या संख्येत मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

20 Sep 2024, 07:26 वाजता

बदलापूर अत्याचार प्रकरणात चार्जशीट दाखल

एसआयटीकडून कल्याण सत्र न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. एसआयटीच्या प्रमुख आयपीएस अधिकारी आरती सिंग यांनी ही पुष्टी केली आहे. दोन गुन्ह्यांच्या दोन स्वतंत्र चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. यात विविध तांत्रिक पुरावे, जबाब समाविष्ट असलेली 500 पेक्षा जास्त पानांची चार्जशीट दाखल केली आहे. या सोबतच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील देण्याचीही मागणी एसआयटीने राज्य सरकारकडे केली आहे. 

20 Sep 2024, 07:22 वाजता

श्रीकांत शिंदेंच्या जनसंवाद यात्रेचा आज तिसरा टप्पा

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा आज पार पडत असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत आजी - माजी खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसेना विभाग स्तरावरील पदाधिकारी, विधानसभा स्तरावरील पदाधिकारी, उपविभाग स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

20 Sep 2024, 07:21 वाजता

नांदेडमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा काँग्रेसचे रमेश चेन्निताल घेणार आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासह अनेक नेते या आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 12 वाजता टिळक भवनमध्ये ही बैठक पार पडणार आहे.

 

20 Sep 2024, 07:21 वाजता

पुण्यातून आता या दोन देशांसाठी थेट फ्लाइट

पुणे विमानतळावरून दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासासाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या 27 ऑक्टोबर पासून सुरु होत आहेत. पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे अशा दोन मार्गांवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होत आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट करून पुण्यातून दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत असल्याचे जाहीर केला आहे.

20 Sep 2024, 07:19 वाजता

महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक

दुपारी तीन वाजता बीकेसी सोफिटल येथे महाविकास आघाडी जागा वाटप चर्चा बैठक होणार.

20 Sep 2024, 07:17 वाजता

महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार -

- 24 आणि 25 सप्टेंबर रोजी अमित शाह महाराष्ट्रात

- 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेलमध्ये होणार महायुतीची अत्यंत महत्त्वाची बैठक

- संभाजीनगरला होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत होणार महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

- मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह निवडक नेत्यांची अमित शाहांसोबत बैठक

- दोन दिवसीय दौऱ्यात शाह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशीही शाह संवाद साधणार