9 Nov 2024, 19:55 वाजता
नंदिग्राम एक्सप्रेसच्या डब्याला लागली आग, प्रवाशांनी ट्रॅकवर मारल्या उड्या
कसारा येथे रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या गवताला आग लागली. गवताला लागलेली ही आग पसरून रेल्वे रुळावर आल्यामुळे याच रुळावरून धावणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेसच्या डब्यालाही आग लागली. यावेळी एक्सप्रेस मधील प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन ट्रॅकवर उड्या मारल्या. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून कॉम्प्रेसरमध्ये आग लागल्याची माहिती मिळत आहे.
9 Nov 2024, 18:49 वाजता
लोणावळयात आमदार सुनील शेळके आणि बंडखोर उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
लोणावळयात आमदार सुनील शेळके आणि बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आमदार सुनील शेळके लोणावळयात प्रचार करत असताना लोणावळयातील राम मंदिरात दर्शनासाठी आले होते. मात्र त्यावेळी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांना दहशत निर्माण केल्याने वातावरण चांगलेच तापले.
9 Nov 2024, 17:25 वाजता
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींना दिली सोडचिट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा तिसऱ्या आघाडी सोबत जाण्याचा निर्णय त्यांच्याच अंगलट आलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींना सोडचिट्टी दिली असून त्यांनी आता महायुती सोबत जाण्याचा घेतला निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तिसऱ्या आघाडीचे संधान बांधल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना सोडचिट्टी दिली आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे यांच्यासह पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कारभारावर नाराज आहेत.
9 Nov 2024, 16:01 वाजता
'एक है तो सेफ है' च्या घोषणेवर शरद पवारांची टीका
'एक है तो सेफ है' च्या घोषणेवर शरद पवारांनी टीका केलीय. 'भाजप विधानसभा निवडणूक जातीयवादाकडे नेत आहे. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
9 Nov 2024, 14:36 वाजता
निवडणूक लढायची असेल तर मर्दा सारखे लढा .. - उद्धव ठाकरे
विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर प्रचार सभा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नांदेडमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणजे मेंदी आणि गद्दार माझ्यावरती आरोप करतात कि मी विचार सोडले, मी विचार सोडलेले नाहीत. केंद्रीय यंत्रणांना बरोबर घेऊन तुम्ही निवडणुका लढता. त्यांच्या युतीत ईडी, सिबिआय आहेत. माझ्याकरता कार्यकर्त्यांना तडीपारीकरता आता जनता 23 तारखेला तुम्हालाही तडीपार करणार. तसेच निवडणूक लढायची असेल तर मर्दा सारखे लढा असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
9 Nov 2024, 13:43 वाजता
महाराष्ट्राच्या लोकांनी भाजपावर खूप प्रेम केलं; महाराष्ट्राची सेवा करण्यात मला वेगळा आनंद मिळतो : मोदी
पंतप्रधान मोदींनी अकोल्यातील भाषणाची मराठीत सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी गजानन महाराजांना नमन केलं. "9 नोव्हेंबर हा महत्वाचं दिवस आहे. आजच्या दिवशी राम मंदिराचा निर्णय सर्वोच न्यायलाने दिला होता," असं मोदी भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "महाराष्ट्राच्या लोकांनी भाजपवर खूप प्रेम केलं. महाराष्ट्राची सेवा करण्यातून मला एक वेगळा आनंद मिळतो," असं पंतप्रधान म्हणाले.
9 Nov 2024, 13:43 वाजता
कोणी झोपडीत राहत असेल तर मला कळवा; पंतप्रधान मोदींचं अकोल्यात आवाहन
"आम्ही 4 करोड घर बांधून दिली. आता आम्ही 3 कोटी नवीन घर बांधायला सुरुवात केली आहे. जर एखादं कुटुंब झोपडीत राहत असेल तर मला कळवा. आघाडीने ज्या मागण्या पूर्ण करू दिल्या नाही ते आम्ही केल्या," असा दावा पंतप्रधान मोदींनी अकोल्यातील भाषणात केला. अकोला जिल्ह्याला कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कापसाचे उद्योग आणि यंत्रणेला पुढे नेण्यात येत आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
9 Nov 2024, 13:43 वाजता
काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवत आहे; पंतप्रधान मोदींचा घणाघात
"महाराष्ट्रात पुन्हा महायुतीच सरकार पाहिजे. महायुती आहे तर गती आहे , तरच महाराष्ट्राची प्रगती आहे. महाआघाडी म्हणजे टोकण मनी, घोटाळे. या दिवसात तेलंगणा, कर्नाटक आता एटीएम बनले आहे. आम्ही महाराष्ट्राला आघाडीचा एटीएम बनू देणार नाही. काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवत आहे. एक है तो सेफ है हे लक्षात ठेवा. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार अपमानित केलं आहे. माझ्यासाठी बाबासाहेब आंबेडकर पूजनीय आहेत," असं मोदी म्हणाले.
9 Nov 2024, 12:57 वाजता
कुऱ्हाडीने वार करुन मसनेच्या जिल्हाध्यक्षाची निर्घृण हत्या
सांगलीमधील मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिरज-पंढरपूर रोडवरील राममंदिर परिसरात अज्ञातांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. कुऱ्हाडीने वार करत खाडे यांचा खून करण्यात आला. उपचार सुरू असताना खाडे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. शेतजामीनीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून गेल्या काही वर्षांपर्यंत मनसेमध्ये सक्रिय होते. मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून राजकारणापासून खाडे अलिप्त होते. काही दिवसांपूर्वी सुधाकर खाडे यांनी भाजपात प्रवेश केला होता.
9 Nov 2024, 12:18 वाजता
ठाकरेंना शिंदेंचा मोठा धक्का! महत्त्वाचा शिलेदार आपल्या पक्षात घेण्यात मुख्यमंत्र्यांना यश
उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातील भिवंडीचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी नाकारल्याने रुपेश म्हात्रे नाराज झाले होते. याबाबतची त्यांची नाराजी त्यांनी जाहिरपणे बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी काल ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत हाती भगवा झेंडा घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला.