सिंधुदुर्ग : कणकवली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांशी अरेरावी करणे कणकवलीच्या नगराध्यक्षांच्या चांगलंच अंगाशी आली आहे. अरेरावी आणि पोलीस स्टेशनमध्ये जावून पोलिसांनाच धमकावल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे देशात कोरोनाविरुद्ध लढाई लढत असताना कणकवली भाजपचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांचे सहकारी कणकवली पोलीस स्थानकात जाऊन गुंडगिरी केली आहे.
समीर नलावडे आणि त्यांचे सहकारी नगरसेवक आबिद नाईक यांनी चक्क पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांनाच धमकावले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अध्याप कुणालाही अटक केलेली नाही. जावेद शेख नावाचा समीर नलावडे यांचा कार्यकर्ता कणकवली बाजारपेठेत फिरत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी त्याला हटकले आणि घरी जाण्यास सांगितले. याचा जावेदला राग आला आणि तो पोलिसांच्या अंगावर धावून गेला. तेव्हा कणकवली पोलीस ठाण्यातून तातडीने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि जावेदला ताब्यात घेत त्याला ठाण्यात आणले.
या घटनेची माहिती मिळताच भाजपचे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, संदीप नलावडे आणि नगरसेवक आबीद नाईक थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस ठाण्यात घुसून थेट पोलिसांनाच धमकावण्यास सुरुवात केली. तुम्ही खाली चौकात या तुम्हाला बघूनच घेतो अशी धमकीच नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली, अशी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी या चौघांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, १८६, १८८, ५०४, ५०६, ३४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या चौघांनाही अटक करण्यात आली नव्हती.