चंद्रकांत खैरेंच्या प्रचार कार्यालयाचं कलशपूजन, भाजप नेत्यांची मात्र दांडी

शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजप कार्यकर्त्यांची दांडी

Updated: Mar 14, 2019, 05:52 PM IST
चंद्रकांत खैरेंच्या प्रचार कार्यालयाचं कलशपूजन, भाजप नेत्यांची मात्र दांडी title=

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना-भाजपा युतीच्या प्रचार कार्यालयाचं कलशपूजन करण्यात आलं. हे प्रचार कार्यालय जरी युतीचं असलं तरी या कार्यक्रमाला भाजपचा एकही स्थानिक नेता आणि कार्यकर्ता उपस्थित नव्हता. या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी दांडी मारल्याने मनोमिलन झालं नसल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान येत्या १७ तारखेला औरंगाबाद मध्ये भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार असून या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. भाजपचा झेंडा इथे आहे म्हणजे त्यांचे नेते सुद्धा आहेत अशी सारवा-सारव खासदार खैरेंनी यावेळी केली.

भाजप-शिवसेना युती झाली असली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमीलन झालेलं नाही असाच मुद्दा पुन्हा पुन्हा समोर येतो आहे. याआधी भाजपकडून मिळालेली शिवसेनेला वागणूक आणि शिवसेनेकडून भाजपवर झालेली गेल्या ४ वर्षातली टीका यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते युती झाली असली तरी एकत्र आलेले अजूनही दिसत नाहीत. युती झाल्यानंतर ही अनेक नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्य़कर्ते एकमेकांचा झेंडा हाती घेतात की नाही हे पाहावं लागेल.

शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांचं मनोमिलन होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये मेळावे घेणार आहेत.