Khelo India Youth Games Haryana 2022 | मुंबई - खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने आज तिसऱ्यादिवशी सुद्धा सुवर्ण कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंग आणि योगा (पारंपरिक), सायकलिंग या क्रीडा प्रकारांतही सुवर्ण पदके पटकावली. कबड्डीत मुला-मुलींचे दोन्ही संघ विजयी झाले.आजच्या तिसऱ्या दिवशी ९ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्य पदके जिकली आहेत. खेलो इंडिया स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने योगासनात ५ सुवर्ण पदके पटकावली. वेटलिफ्टिंगमध्येही २ मुली आणि एका मुलाने सुवर्ण मिळवले. सायकलिंगमध्येही सुवर्ण कामगिरी झाली. अशी एकूण ९ सुवर्ण पदके मिळाली. योगा (१), सायकलिंग (२) आणि कुस्तीत (१) अशी चार रौप्य पदके तर दोन कुस्तीत कांस्य पदके मुलींनी जिंकली दिली.
ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राने विविध क्रीडा प्रकारांत पदकांची लयलूट केली. सर्वाधिक पदके योगासनात मिळाली. त्यात ५ सुवर्ण आणि एक रौप्य पदकाचा समावेश आहे. पारंपरिक योगा प्रकारात सुमित भंडारे (सुवर्ण, संगमनेर), आर्टिस्टिक पीअरमध्ये - वैदेही मयेकर व युगांका राजम (सुवर्ण), आर्टिस्टिक पीअर मुले - आर्यन खरात व निबोध पाटील (सुवर्ण), रिदमिक योगा - नानक अभंग व अंश मयेकर (सुवर्ण), मुली - स्वरा गुजर व गीता शिंदे (सुवर्ण). पारंपरिक योगा - तन्वी रेडीज (रौप्य).
वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सलगरने सुवर्ण पदक पटकावले. याच क्रीडा प्रकारात नंतर सायंकाळी उशिरा दोन पदके मिळाली. ५५ किलोमध्ये -मुकुंद आहेर (सुवर्ण), ४५ किलो वजनगट- हर्षदा गरूड (सुवर्ण)
सायकलिंगमध्ये टाईम ट्रायलमध्ये संज्ञा कोकाटे (सुवर्ण), स्क्रॅच रेसमध्ये पूजा दानोळेस (रौप्य), टीम स्प्रिंटमध्ये आदिती डोंगरे, पूजा दानोळे व संज्ञा कोकाटे (रौप्य).
कुस्तीमध्ये एक रौप्य पदक मिळाले तर दोन कांस्य पदके आली. ४६ किलो वजन गटात - गौरी पाटील (कोल्हापूर) व ५७ किलो वजन गटात धनश्री फंड (अहमदनगर) यांनी कांस्य पदके पटकावली. तर ५७ किलो वजनगटात प्रगती गायकवाड हिने रौप्य पदकावर नाव कोरले. तिचा सुवर्ण पदकासाठीची लढत हरियानाच्या ज्योतीसोबत झाली. मुलांमध्ये गौरव हजारे, ओंकार शिंदे, समृध्दी घोरपडे, साक्षी पाटील यांनीही चमकदार खेळ केला. परंतु त्यांना पदकापर्यंत पोहचता आले नाही.
खेलो इंडिया स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलांच्या कबड्डी संघाने आंध्र प्रदेशचा तब्बल १९ गुणांनी तर मुलींच्या संघांने झारखंडचा ४५ गुणांनी धुव्वा उडवला होता. तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने कांस्य पदकाने खाते उघडले. गतका (सोटी-फरी सांघिक) या क्रीडा प्रकारात मुलींनी हे पदक पटकावले.